पवई तलाव आणि परिसराची दुर्दशा; पालिकेचे देखभालीकडे दुर्लक्ष

पवई तलावात जलपर्णीचे वाढलेले साम्राज्य

मुंबईमधील पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दुषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. सोबतच तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत.

तलावाच्या सुशोभिकरण आणि साफसफाईसाठी पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले संगीत कारंजे बंद पडले आहेत. धावण्यासाठी, चालण्यासाठी बनवलेले ट्रॅक, कठडे यांची मोडतोड होत वाताहत झाली आहे. लोखंडी सुरक्षा कुंपणे तुटली आहेत. तलावामध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

गटारावरील गायब ढाकणे आणि तुटलेल्या पदपथाचा भाग

मुंबईचे हृदय म्हणून ओळख असणाऱ्या पवई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असणाऱ्या वृक्षवल्लींनी नटलेल्या परिसरात पवई तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात गगनचुंबी इमारती, आयआयटी मुंबई, विविध कार्यालये निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि या परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. या सोबतच पवई तलाव परिसर हा मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक महत्वाचा भाग झाला.

पदपथाच्या कडेला उभे करण्यात आलेले लोखंडी सुरक्षा कंपाऊंड मोडून पडलेल्या अवस्थेत

पर्यटकांचे आकर्षण लक्षात घेता पालिकेतर्फे या परिसरात करोडो रुपये खर्च करून सौंदर्यकरण प्रकल्प राबवण्यात आला. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आतापर्यंत सुशोभिकरणासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत.

तलावाच्या आसपासच्या परिसरात उभ्या राहिलेल्या इमारतीचे सांडपाणी या तलावात सोडण्यास सुरुवात झाली आणि हळूहळू या तलावाचा ऱ्हास सुरू झाला. तलावातच मलजल सोडण्यात आल्याने पाणी दूषित झाले. धार्मिक विधीचे साहित्य तलावात फेकण्यात येते. तलावात फोफावणारी जलपर्णी हटविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. योजना आखताना नागरिकांच्या सूचना आणि हरकतीही लक्षात घेणे गरजेचे आहे, मात्र तसे केले जात नाही,” असे याबाबत बोलताना पर्यावरण प्रेमी सुनिष सुब्रमण्यन कुंजु यांनी सांगितले.

तलावात जलपर्णी बेसुमार वाढल्या आहेत. पाठीमागील अनेक वर्षात या तलावात अस्ताव्यस्त पसरलेली जलपर्णी हटविण्यात आलेली नाही. जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. तलावामध्ये बेटासारखे मोठाले दगड होते. या दगडांवर मगरी तासंतास बसलेल्या आढळून येत. परंतु हे दगड गायब झाले असून, तलावातील मगरींचे दर्शन दुर्लभ झाले आहे. असेही याबाबत बोलताना पर्यावरण प्रेमी म्हणाले.

मोटारसायकलसाठी सुरक्षा कठडा तोडून बनवण्यात आलेला मार्ग

तलावाकाठी नागरिकांना फेरफटका मारता यावा यासाठी बनवलेले पदपथाची दुर्दशा झाली आहे. पदपथाच्या कडेला उभे करण्यात आलेले लोखंडी सुरक्षा कंपाऊंड मोडले आहेत. तलावाच्या आत बनवण्यात आलेले संगीत कारंजे काही महिन्यातच बंद पडले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये धावण्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र मार्गिकेवर वाहने उभी केली जात आहेत. काही ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले डेरे टाकले आहेत. देखभालीअभावी या तलावाच्या सौंदर्यकरणात केलेला खर्च पाण्यात गेल्याचे दिसते आहे.

पदपथाचा उखडलेला भाग

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!