पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा

तलाव भागात सुरु असणारे काम आणि त्यासाठी टाकण्यात आलेला मलबा

ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला आहे. असे असतानाच त्यात भर म्हणून आता या भागात खोदकाम, बांधकामानंतर निघणारा मलबा आणून टाकला जात आहे.

सुरुवातीला कोणीतरी बाहेरून आणून हा कचरा येथे टाकत असावा असा अंदाज बांधला जात होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून पवईकरांनी हा मलबा पवईतील जेव्हीएलआर भागात सुरु असणाऱ्या मेट्रो कामाचा असल्याचा सुद्धा कयास बांधत पोस्ट वायरल करायला सुरवात केली होती. मात्र ‘आवर्तन पवई’ने याचा पाठपुरावा करत या मलब्या मागचे सत्य आणि रहस्य शोधून काढले असून, येथे होत असणाऱ्या एका कामासाठी हा मलबा येथे आणला गेल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळापैकी एक असणाऱ्या पवई तलाव सध्या संकटांच्या मगरमिठीत अडकला आहे. करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होवून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून, तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे.

पवई तलाव भागात टाकण्यात आलेली डेब्रिज (मलबा)

एवढ्यावरच थांबले नसून या तलावात १७ वाहिन्यांमधून राजरोसपणे मलजल आणि सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे पाण्याचा दर्जा खालावून तेथे जलपर्णींचे साम्राज्य वाढत तलावातील पाण्याचे प्रमाण घटत त्याला मैदानांचे स्वरूप प्राप्त होत आहे. या सर्व कारणांमुळे सध्या पवई तलावासह यात असणाऱ्या जलचरांचा जीव सुद्धा धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे मगरींचे दररोज दर्शन घडणाऱ्या या मुंबईतील एकमेव ठिकाणावरून आता मगरी सुद्धा गायब झाल्या असून, आता त्या दिसणे बंद झाल्यामुळे निसर्ग आपले अस्तित्व हरवत असल्याची भीती सध्या मुंबईकर व्यक्त करत आहेत.

ही परिस्थिती कमी होते की काय, “घरचं झालं थोडं, अन व्ह्यानं धाडलं घोडं या म्हणी प्रमाणे सध्या पवईतलाव भागात नवनवीन समस्या पाह्यला मिळत आहेत. पाठीमागील काही दिवसांपासून या भागात डेब्रिज (मलबा) टाकला जात असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला हा मलबा कोणीतरी रात्रीच्या अंधारात आणून टाकत असल्याचा कयास बांधला जात होता. नंतर त्यात मेट्रो सहाच्या कामाचा मलबा असल्याचा कयास लावला जावू लागला आहे. या संदर्भात सोशल मीडियातून पालिकेला जाब विचारण्याचे काम सुद्धा काही लोकांनी केले मात्र या मागचे रहस्य गुलदस्त्यातच होते.

अखेर आवर्तन पवईने याचा पाठपुरावा करत पालिका ‘एस’ विभाग आणि हायड्रोलिक इंजिनिअर विभागाचे कार्यालय गाठत याची माहिती मिळवण्याची सुरुवात केली. मात्र खाते हे आमच्या अखत्यारीत येत नसून, तुम्ही दुसऱ्या खात्याकडे चौकशी करा अशी उत्तरे मिळत होती. मात्र आवर्तन पवईने हार न-मानता याबाबत पालिकेला तक्रार (तक्रार क्रमांक ०७२२३५६८४२) करून सरळ पालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्याकडे आपला पाठपुरावा सुरूच ठेवला. मात्र ते सुद्धा मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या सहाय्यकांनी याबाबत माहिती मिळवत संबंधित विभागाशी (घन कचरा व्यवस्थापन) संपर्क बनवून दिला आणि बुधवारी उशिरा या डेब्रिज प्रकरणाचे रहस्य उलगडले.

‘पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या वाटेच्या दरवाजांची दुरावस्था झाली आहे. हे दरवाजे बदलण्याचे आणि दुरुस्तीचे काम सध्या एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र तलावात सोडले जाणारे पाणी थांबत नसल्याने त्याला त्या भागात काम करणे अवघड होत असून, पाणी रोखण्यासाठी त्याने हा मलबा या भागात आणून टाकला आहे. काम संपुष्टात येताच तो हा संपूर्ण मलबा हटवणार आहे’ असे याबाबत बोलताना नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर दुय्यम अभियंता पदाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पवई तलावात टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजचा प्रश्न आता मिटला असला तरी या भागाची समस्या संपलेली नाही. पवई तलावाला लाभलेले हे निसर्ग सौंदर्य हळू हळू नष्ट होण्याच्या मार्गावर असून, पवई इन्फो, आवर्तन पवई, यंग एनवायरनमेंट ट्रस्ट, महाराष्ट्र एग्लिंग क्लब आणि पवईकरांच्या माध्यमातून तलाव वाचवण्यासाठी मोहीम सुरु आहे. या मोहिमेत https://www.powailake.org/ च्या माध्यमातून आपण आपला सहभाग नोंदवू शकता.

, , , , , , , , , , , ,

Trackbacks/Pingbacks

  1. आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली | आवर्तन पवई - June 8, 2019

    […] घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी “पवई तलाव भागाचा झाला उकिरडा, परिसरात … या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!