आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा

पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने हयगय करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यावर खात्या अंतर्गत कारवाई केली असून, पवई पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करून लवकरच हे डेब्रिज हटवण्याचे काम सुरु करणार असल्याचे दुय्यम अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक मानाचे स्थान मिळवलेल्या पवई तलाव भागाचा पाठीमागील काही वर्षात उकिरडा आणि नाला झाला आहे. पवई परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी पवई तलावात सोडले जात असल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून तो नष्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. त्यात भर म्हणूनच की काय आता या भागात खोदकाम आणि बांधकामानंतर निघणारा मलबा आणून टाकला जात आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून पवईकरांनी आवाज उठवत हा मलबा पवईतील जेव्हीएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रो कामाचा असल्याच्या दावा केला होता. अशी तक्रार सुद्धा नागरिकांनी पालिकेकडे केली होती. मात्र आवर्तन पवईने याचा पाठपुरावा करत सरळ पालिका सहाय्यक आयुक्त ‘एस विभाग’ संतोष कुमार धोंडे याच्या दफ्तरी हजेरी दिल्याने, घनकचरा विभागाच्या दुय्यम अभियंता दर्जाच्या व्यक्तीने याचे रहस्य उलगडत, पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या वाटेच्या दरवाजांची दुरावस्था झाली आहे. हे दरवाजे बदलण्याचे आणि दुरुस्तीचे काम सध्या एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. हे काम करताना काही अडचणी येत असल्याने पाणी थांबवणे, ओहोळ बनवणे, आधार बनवणे अशा कामांसाठी हा मलबा या भागात आणून टाकला आहे. काम संपुष्टात येताच तो हा संपूर्ण मलबा हटवला जाणार आहेअसे याबाबत बोलताना नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर सांगितले.

मात्र यामुळे तलावाला नुकसान पोहचत असून, या व्यतिरिक्तही अनेक भागात बांधकामाचा मलबा पडून असल्याचे आवर्तन पवईने निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात माहिती मिळवत या भागाची जबादारी असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांवर हलगर्जीपणासाठी खातेनिहाय कारवाई करण्यात आली आहे. ‘पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या लोकांविरोधात लवकरच पालिकेतर्फे पवई पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करून आम्ही तो मलबा उचलू’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना दुय्यम अभियंता आणि अभियंता पदाच्या व्यक्तींनी सांगितले.

पालिकेच्या फक्त आश्वासनाने हुरुळून जावून चालणार नाही, पवई तलावाच्या समस्या अजून संपलेल्या नाहीत. पवईला पवई तलावाच्या रुपात लाभलेले हे निसर्ग सौंदर्य हळू हळू नष्ट होण्याच्या मार्गावर असून, पवईकरांनी यासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे, असे आवाहन “पवई-लेक ऑर्गनायझेशनच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://www.powailake.org/ च्या माध्यमातून आपण आपला सहभाग नोंदवू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!