पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?

कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले.

काल जोरदार पावसाने मुंबईला झोडपल्यामुळे संपूर्ण मुंबापुरी तुंबली होती. अशात आपला माणूस कुठे अडकला आहे? मुंबईत कोणत्या ठिकाणी काय परस्थिती आहे याची माहिती जाणून घेण्यात गुंतलेल्या मुंबईकरांना पवई तलावातून मगर बाहेर आल्याचे छायाचित्र सोशल मिडियावरून वायरल झाले होते.

मगर निघाल्याची बातमी काही वेळातच मुंबईत जेवढ्या जोमाने पाऊस नसावा, त्याच्या पेक्षाही मोठ्या जोमाने लोकांच्या पर्यंत पोहचली आणि कोणतीही खात्री न-करता सोशल माध्यमातून ती पुढे पसरत राहिली. यामुळे काल गणेश विसर्जनासाठी पवई तलावावर आलेल्या अनेक मुबईकरांना तिला बघण्याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, शेवट पर्यंत मगर निघाल्याची जागा आणि बघणारी व्यक्ती कोणीच मिळून आले नाही.

प्राणीमित्र संघटना काय म्हणते?

याबाबत ‘पॉज मुंबई’चे संस्थापक सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांच्याशी संपर्क साधला असता “मगर निघाल्याची माहिती प्राणीमित्र संघटनांच्या गृप्सवर फिरत होती. मात्र कोणाकडेच याची अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. मी त्याबाबत गृपवर विचारणाही केली मात्र कोणीच समोर आले नाही. काही मित्रांनी हा फोटो त्यांनी आधीही पहिला असल्याचे सांगितल्यानंतर माझी खात्री झाली कि बातमी खोटी आहे.

मुंबई पोलीस

याबाबत पवई तलाव ज्यांच्या अखत्यारीत येतो त्या पवई पोलिस ठाण्यात फोन करून आवर्तन पवईने अशी कोणती घटना घडली आहे का याबाबत विचारणा केली असता ड्युटी ऑफिसरने अशी कोणतीच माहिती पोलीस ठाण्याला कळवण्यात आली नसल्याचे सांगितले.

काल पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्यामुळे मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट दोन्ही ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत आवर्तन पवई प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी सुद्धा असे काही घडले नसल्याची पुष्टी दिली.

वन विभागाला माहिती नाही

याबाबत अखेर आवर्तन पवईने वन विभागाच्या ठाणे कार्यालयाला याबाबत काही माहिती मिळाली आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी सुद्धा अशी कोणतीही तक्रार किंवा माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.

मुंबई पोलीस, प्राणीमित्र संघटना आणि वन विभाग अशा कोणालाच पवई तलावातून मगर बाहेर पडल्याची माहिती किंवा तक्रार मिळाली नाही. मगर बाहेर निघालेली पाहणार व्यक्ती सुद्धा मिळून आला नाही, त्यामुळे पवई तलावातून मगर बाहेर आल्याची बातमी अफवा असल्याचेच समोर येत आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!