पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही

कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.

मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू खालावत चालली असून, पृष्ठ भागावर वाढत चाललेल्या जलपर्णी, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या यामुळे आता तो कुरुप दिसू लागला आहे. पालिका नवीन कंत्राटदार नेमण्यात अयशस्वी झाल्याने तलावाला जवळपास सहा महिन्यांपासून साफ करण्यात आले नाही, त्यामुळे हळूहळू तो नष्ट होणार की काय याची भीतीच आता पर्यावरण प्रेमीना सतावत आहे.

पालिकेने तलावाच्या पाच वर्षाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी ११ कोटी रुपयांची निविदा मार्च महिन्यात काढली होती, पण लवकरच निविदा रद्द करण्यात आल्या. जर आताच जलपर्णी काढण्यासाठी पाऊले उचलली गेली नाहीत, तर लवकरच संपूर्ण पृष्ठभाग जलपर्णीने व्यापला जाईल. ज्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी होईल आणि सूर्यप्रकाशास पृष्ठभागावर पोहोचण्यास अडथळा येईल. तलावातील माशांना आणि जलचरांना यामुळे धोका संभवतो.

२२० हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला हा तलाव विशेषतः शनिवार व रविवारी पर्यटनस्थळांकडे धाव घेणाऱ्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येथे १७ प्रवेश आहेत ज्याच्याद्वारे सांडपाणी तलावात प्रवेश करते. घाणपाणी तलावामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पाण्याच्या नाल्यांमध्ये छोटे बंधारे बांधण्याचे काम सध्या येथे सुरु आहे. तलावाच्या साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी पाठीमागील १० वर्षात जवळपास ५० करोड रुपये खर्च करून तलाव भागात एलईडी दिवे लावण्यात आले आहेत, लोकांना चालण्यासाठी वॉकवे तयार करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व व्यर्थ ठरत असून, पवई तलावाच्या झालेल्या दुर्दशेला पाहता आता पर्यटकांनी सुद्धा इकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.

या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. तलावाच्या किनाऱ्यालगत सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र मुंबई मेट्रो मार्ग-६ प्रकल्पामुळे हे काम स्थगित करण्यात आले आहे. लवकरच हे काम सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे.

“बेकायदा सांडपाणी तलावात सोडल्यामुळे तलावातील पाण्याचा पृष्ठभाग झाकणारी जलपर्णी आणि इतर वनस्पती निर्माण झाल्या आहेत. यामधून वाहून आलेल्या प्लास्टिकचे आवरण त्यात भर टाकत आहे. याक्षणी कोणताही कंत्राटदार नाही, परंतु नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. कचरा विविध डम्पिंग स्पॉट्सपर्यंत घेवून जाण्यासाठी सुद्धा कंत्राटदार जबाबदार असेल,” असेही याबाबत बोलताना एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!