लेक फ्रंट सॉलीटीअर चोरी: ४ आरोपींना अटक; गटारात दागिन्यांचा शोध; ९५% रिकव्हरी

पवईतील लेक फ्रंट सॉलीटीअर इमारतीत राहणारे हरीष जॉन कट्टुकरन यांच्या फ्लॅट नंबर ५०२ मध्ये २० जुलै रोजी एका अज्ञात चोरट्याने गॅस पाईपच्या सहाय्याने प्रवेश करत २६ लाख ८५ हजार रुपयाचे सोने, चांदीचे हिरेजडीत दागिने चोरून नेले होते.

डावीकडून: मुख्य आरोपी अजय उर्फ बाबू विजय विश्वकर्मा, अमजद अफजल खान, महेंद्र तुलसीराम घांची आणि राध्येशाम राममुरद सोनी

पवईतील लेक फ्रंट सॉलीटीअर इमारतीत राहणारे हरीष जॉन कट्टुकरन यांच्या फ्लॅट नंबर ५०२ मध्ये २० जुलै रोजी एका अज्ञात चोरट्याने गॅस पाईपच्या साहाय्याने प्रवेश करत २६ लाख ८५ हजार रुपयाचे सोने, चांदीचे हिरेजडीत दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याची केवळ २० दिवसात उकल करत पवई पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून पोलिसांनी २४,९७,५०० किंमतीच्या दागिन्यांची रिकव्हरी सुद्धा केली आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीष कट्टुकरन यांचा ७ व्या मजल्यावर ३ बीएचकेचा फ्लॅट आहे. २० जुलै रोजी ते आपल्या परिवारासह येथील दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये झोपले होते. सकाळी ६.४५ वाजता त्यांच्या पत्नीला हॉलमधील खिडकी उघडी असल्याचे आढळून आले. शंका आल्याने त्यांनी हरीष यांच्यासह घर तपासले असता मास्टर बेडरूममध्ये असणारे कपाट उघडे असून, त्यातील सामान जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले.

कपाटातील सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २६,८५,००० किंमतीची चोरी झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी इमारतीचे सेक्रेटरी यांना फोन करून याबाबत माहिती सांगितली असता, त्याच इमारतीच्या चौथ्या आणि सहाव्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅट क्रमांक २०२ आणि ४०२ मध्ये सुद्धा चोरीचा प्रयत्न झाला असल्याचे समजले. यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली होती.

१० सेकंदाचा व्हिडीओ आणि खबरी जाळे

“केवळ १० सेकंदाचे एक अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळून आले होते. तसेच आरोपीशी निगडीत कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी) विजय दळवी यांनी सांगितले.

“घटनेच्या दिवशी जोरदार पाऊस सुरु होता. संपूर्ण परिसरात काळोख पसरलेला असताना आरोपी हा लेक फ्रंट सॉलीटीअर इमारतीचे २ मजली पार्किंग आणि त्यानंतर ५ मजले गॅस पाईपच्या साहाय्याने चढलेला होता. इमारतीचे जास्तीत जास्त सीसीटीव्ही चालू नव्हते त्यामुळे आरोपीचे इतर कोणतेच फुटेज आम्हाला मिळू शकले नव्हते,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले. “तपास सुरु असताना आमच्या गुप्त बातमीदाराने फुटेजशी जुळणारा एक तरुण अलकापुरी, नालासोपारा येथे असल्याची माहिती दिली. आम्ही त्या भागात सापळा रचून आरोपी नामक अजय उर्फ बाबू विजय विश्वकर्मा (२४) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महामुनी यांनी सांगितले.

आरोपीच्या चौकशीत त्याने आपला एक साथीदार अमजद अफजल खान (३४) याच्या मदतीने दागिने विकले असल्याचे सांगितले. यानुसार पवई पोलिसांनी अमजद खान याच्यासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या महेंद्र तुलसीराम घांची (३०) आणि राध्येशाम राममुरद सोनी (४२) यांना अटक केली आहे.

गटारात घेतला दागिन्यांचा शोध

आरोपी अजय याने हिऱ्याचे दागिने खोटे असल्याचे जाणवत असल्याने गटारात टाकले असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारावर नालासोपारा येथे दाखवलेल्या गटारात पोलिसांनी कामगारांच्या मदतीने शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २४,९७,५०० किंमतीच्या दागिन्यांची रिकव्हरी केली आहे. तसेच चोरीच्या मालमत्तेतून खरेदी केलेली एक स्कुटी आणि वॉशिंग मशीन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त अंकित गोयल (परिमंडळ १०), सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी) विजय दळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महामुनी, पोलीस नाईक बाबू येडगे, पोलीस नाईक नितीन खैरमोडे, पोलीस नाईक ब्रिजेश पवार, पोलीस शिपाई सचिन गलांडे, पोलीस शिपाई अभिजित जाधव आणि पोलीस शिपाई प्रशांत धुरी यांनी ही कारवाई केली.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!