‘लेट्स मेक समर कुल’ अंतर्गत हेल्पिंग हॅन्ड्सतर्फे पवईत वृक्षारोपण मोहीम

‘लेट्स मेक समर कुल’ अंतर्गत हेल्पिंग हॅन्ड्सतर्फे पवईत वृक्षारोपण मोहीमकोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराने महाराष्ट्रात पुन्हा थैमान घालायला सुरुवात केलेली असतानाच किमान निसर्गाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आणि त्याचा समतोल साधण्यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स फॉर ह्युमॅनिटीतर्फे ‘लेट्स मेक समर कुल’ अंतर्गत पवईत वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. सोबतच परिसरातील स्वच्छता मोहीम देखील राबवली जात आहे.

मार्च महिना संपता संपता आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत उन्हाच्या झळा आणि उकाडा जाणवू लागला आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी आहे. त्यातच पाठीमागील काही दिवसात कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले असून, गेल्या वर्षा पेक्षाही जास्त प्रमाणात त्याचा फैलाव झाला आहे. असे सर्व सुरु असतानाच निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल अजून काय संकट घेवून येईल माहित नाही. हेच लक्षात घेत अडल्या नडलेल्याना मदतीचा हात देण्यासोबतच पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी हेल्पिंग हॅन्ड्स फॉर ह्युमॅनिटी ही संस्था पुढे सरसावली आहे.

लेट्स मेक समर कुल

संस्थेतर्फे रामबाग पवई आणि आसपासच्या परिसरात ‘लेट्स मेक समर कुल’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबतच पवईतील प्रत्येक व्यक्तीने किमान एक रोपटे लावण्याचे आणि त्याला जगवण्याचे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात म्हणून रविवारी संस्थेतर्फे रामबाग परिसरात ३० पेक्षा अधिक विविध प्रकारची रोपटी लावण्यात आली. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ करण्यात आला.

“परिसरात निसर्ग संवर्धनासाठी केले जाणारे हे कार्य अतिमहत्वाचे आहे. परिसरात असणारी हिरवळ ही केवळ परिसराची शोभा वाढवत नसून, निवारा देण्याचे, ताजी स्वच्छ हवा देण्याचे, पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम करत असते. त्यामुळे प्रत्येक पवईकरानेच नव्हे तर प्रत्येक भारतीयाने आपल्या परिसरात यासाठी काम करणे आवश्यक आहे,” असे यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा अनिता सिंग यांनी सांगितले.


आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!