रामबाग उड्डाणपुलाजवळ डिव्हायडरला धडकून अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू

डिव्हायडरला धडकून मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

पवई, रामबाग उड्डाणपुलाजवळ अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी रात्री पवईत घडली. २० वर्षीय तरुण विक्रोळीच्या दिशेने जात असताना  डिव्हायडरला (दुभाजक) धडकून हा अपघात झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे. स्वप्नील सुभाष अहिवले (२०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्रपाळी कर्तव्यावर असणाऱ्या पवई पोलीस ठाणे मोबाईल ५ या वाहनाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) जाणाऱ्या एक वाहन चालकाने रामबाग उड्डाण पुलाजवळ एका मोटारसायकल चालकाचा अपघात झाला असल्याची माहिती रात्री १२.४५ वाजता दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता एक इसम मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या पत्र्याजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. मोबाईल १च्या मदतीने त्याला त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी दाखलपूर्व मृत घोषित केले.

“गोरेगाव येथे राहणारा हा तरुण आपल्या पल्सर २२० मोटारसायकल क्रमांक एमएच ०२ सीएक्स २९८३ वरून जेविएलआरमार्गे विक्रोळीच्या दिशेने जात होता. घटनास्थळी आम्हाला त्याची मोटारसायकल मिळून आली आहे. मोटारसायकलचे पुढील चाकाच्या रिंगचे नुकसान झाले आहे. टाकीला मार लागल्याने टाकीतून पेट्रोल सांडत होते. मोटारसायकल डिव्हायडरला धडकून अपघात झाला असल्याचे दिसत आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“मेट्रोचे काम सुरु असल्याने उड्डाण पुलावर जाणारा रस्ता रात्रीच्या वेळी बंद करण्यात येतो. मोटारसायकल वेगात असल्याने तरुणाच्या ही गोष्ट पटकन लक्षात न आल्याने डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात पवई पोलीस भादवि कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!