सिमकार्ड पडले ‘लाख’ रुपयाचे

नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन बुकिंग करणे एका पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. सिमकार्डसाठी पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

रामबाग पवई येथे राहणारे सौरभ घोष (४७) यांनी नवीन मोबाईल फोन खरेदी केला होता. या मोबाईलमध्ये वापरण्यासाठी त्यांना जिओचे सिमकार्ड हवे असल्याने त्यांनी गुगलवर ‘जिओ सिम कार्ड सेलर इन पवई’ असे सर्च केले असता पवईतील काही दुकानांचे नंबर दाखवले होते. “हिरानंदानीतील आबराकाडबरा या दुकानाच्या नावाखाली दिलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क साधत नवीन सीम कार्डबद्दल विचारले. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना एक नवीन योजना सुरू असून, केवळ पाच रुपयांत सिमकार्ड दिले जाईल असे सांगितले” असे याप्रकरणात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

त्या व्यक्तीने त्यांना ही योजना मिळवण्यासाठी त्वरित ऑनलाईन पैसे भरावे लागतील असेही सांगितले. तुमच्याकडे गुगल पे किंवा पेटीएम आहे का? अशी विचारणा करत एक लिंक पाठवून त्यावर ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी लिंकवर जाऊन हा अर्ज भरून सबमिट करताच त्यांच्या मोबाईलवर एकापाठोपाठ एक ९९९९ रुपयाचे १३ व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले ज्यातील ३ क्रेडीटचे तर १० डेबिटचे व्यवहार होते. या आर्थिक व्यवहारात ९९ हजार ९९० रुपये परस्पर खात्यातून निघून गेले होते.

“५ रुपयांच्या बदल्यात खात्यातून ९९,९९० रुपये वजा झाल्याने तक्रारदार यांनी त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.” असे याबाबत बोलताना पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे यांनी सांगितले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच घोष यांनी त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्याचे व्यवहार बंद करत पवई पोलिसात धाव घेवून तक्रार दाखल केली. पवई पोलिस भादवि आणि माहिती तंत्रद्यान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तांत्रिक पुराव्यांच्या आधावर अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!