सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा

सार्वजनिक ठिकाणी नशा करायला बसताय? सावधान! तुम्हाला काढायला लागू शकतात उठाबशा.

वायरल होणारया एका व्हिडीओमध्ये पवईत सार्वजनिक खेळाच्या मैदानात काही तरुण आपले कान पकडून उठाबशा काढताना दिसत आहेत. नाही, ही कोणत्याही शाळेने किंवा कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा नाही, तर पवई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांना दिलेली शिक्षा आहे. तरुणांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांना शिक्षा आणि समज मिळावी म्हणून पोलिसांनी ही वेगळी शिक्षा दिली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पवई परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पवई पोलिसांतर्फे वेळोवेळी पायी गस्त घातली जाते. या गस्तीवेळी पोलिस अधिकारी गर्दीच्या ठिकाणासोबतच निर्जन आणि पडक्या इमारतीच्या भागात गस्त घालत पाहणी करत असतात.

२३ ऑगस्टला पवईतील आयआयटी परिसरात गस्त घालत असताना पोलिस पथकाला काही तरुण येथील एका खेळाच्या मैदानात बसून नशा करत असल्याचे आढळून आले. या तरुणांची धरपकड करत पोलिसांनी त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांना तिथेच उठाबशा काढायला लावत शिक्षा आणि समज देवून सोडून दिले.

‘नशा करताना सापडलेल्या तरुणांपैकी काही कॉलेज विद्यार्थी तर काही शिक्षित तरुण होते. त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांचे आयुष्य खराब करणे योग्य नव्हते. मात्र त्यांना शिक्षा आणि समज देणे आवश्यक होते, म्हणूनच आम्ही त्यांना उठाबशा काढायला लावत शिक्षा केली,’ असे याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , ,

One Response to सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा

  1. Atin August 30, 2019 at 8:43 pm #

    खूप छान! मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन. अश्याच प्रकारे महानगरपालिकेच्या शाळे जवळच्या मैदानात रोज रात्री ते पहाटेपर्यंत व कधी दुपारच्या वेळि काही अज्ञात इसमांचा हैदोस सुरू असतो. मैदानात राखणदार नसल्यामुळे हे सर्व वर्षीयां वषे चालत आहे.
    ट्रिनिटी सोसायटी बाहेर देखील IBS कॉलेजच्या मुला मुलींचे मोठ मोठ्याने संभाषण व वाढदिवस रात्री अकरा विजेपासून पहाटे पर्यंत साजरा केला जातो. ह्या मुळे आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या वयस्कर सीनियर सिटिझन , लहान मुले, आजारी असलेल्या रुग्णांना, परीक्षा देत असलेल्या मुलांना, व दमून भागून आलेल्या मुंबईकरांना रात्री झोपताना ह्या सर्वांचा त्रास भोगावा लागतो. ह्या संबंधात मुंबई पोलिसांनी ह्या गोष्टीकडे लक्ष टाकावे व कायमस्वरुपी निकष लावावा अशी विनंती.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes