आयआयटी येथील हर्बल कंपनीच्या कार्यालयात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

यआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून ९.५० लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

रेहमत अली हा पूर्वी याच कंपनीत काम करत होता. सहा महिन्यांपूर्वी काम सोडल्यानंतर त्याने हा चोरीचा कट रचला होता. चोरीच्या दिवशीच दोघे मुंबईत दाखल झाले होते. चोरीनंतर त्याच दिवशी अली विमानाने तर सिंग ट्रेनने दिल्लीला परतले.

आयआयटी, पवई येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये असणाऱ्या उदय इ कॉमर्स येथील मँनेजर सुमित राठोड (२२) हे आठवडाभर त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम रविवारी जमा करत असतात. रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी सुद्धा ते त्यांच्याकडे जमा झालेली ९.५० लाख रुपयाची रक्कम बॅगेत भरून जमा करण्यासाठी निघाले होते. ते बाहेर निघत असतानाच तोंडावर बुरखा घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून, त्यांच्या तोंडाला पट्ट्या मारून, बांधून ठेवून त्यांच्याकडील रोकड घेवून तेथून पोबारा केला होता.

“आम्ही आसपासच्या परिसरात असणाऱ्या सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेज ताब्यात घेवून तपास सुरु केला होता. सोबतच मिळालेल्या टेक्निकल माहितीच्या आधारे आम्हाला चोरट्यांबाबत सुगावा लागला,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“पाहिजे आरोपी हे दिल्लीत असल्याची माहिती मिळताच आम्ही गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक देसाई यांचे एक पथक तयार करून दिल्लीला पाठवून, तेथून आरोपींना अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

पोलिसांनी अटक आरोपींकडून ६.३५,००० रोकड हस्तगत केली आहे.

भादवि कलम ३४२, ३९२, ४५२, ५०४, ३४ नुसार दोन्ही आरोपींना अटक करून स्थानिक कोर्टात हजर केले असता त्यांना अधिक चौकशीसाठी २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes