महागडे फोन कस्टम भावात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

महागडे फोन कस्टम भावात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून, काचेचे तुकडे देणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवईतील हिरानंदानी गार्डन भागात फसवणुकीच्या प्रयत्नात असताना हिरानंदानी कमांडोच्या मदतीने पवई पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे विमानाने प्रवास करून ही टोळी मुंबईत येवून गुन्हे करून पुन्हा त्याच मार्गे परतत होती. मोहंमद शेहजाद इरफान सिद्दीकी (३२) आणि मोहंमद झिशान नासिर अहमद राणा (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ९० रिकामी पाकिटे, काचेचे तुकडे आणि काही महागडे मोबाईल अशी १ लाख १४ हजार किंमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.

ऑनलाईन मोबाईल खरेदी करणाऱ्या नागरिकांची दगड किंवा काचेचा तुकडा पाठवून फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी मुंबईत उघडकीस येत असतात. मात्र प्रत्यक्षात समोर मोबाईल घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांच्या हातात फक्त काचेचाच तुकडा पडल्याच्या घटना सुद्धा आता मुंबईमध्ये घडू लागल्या आहेत. बुधवारी हिरानंदानीत फसवणुकीच्या प्रयत्नात असताना पवई पोलिसांनी अशाच एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गुन्ह्याची पध्दती

मूळचे उत्तरप्रदेश मधील मेरठ येथील रहिवाशी असणारे इरफान आणि झिशान हे विमानाने मुंबईला येत. मुंबई आल्यानंतर बीकेसी येथील एका झोपडपट्टीत भाड्यावर ते रूम घेत. ८ ते १० दिवसासाठी भाड्याने मोटारसायकल घेत. त्यानंतर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये जावून ही टोळी आपल्या शिकारीला पकडत. समोरील व्यक्तीला आपण कस्टममधून माल काढून आणला आहे असे सांगत त्यांना आपल्या जवळील महागडे मोबाईल दाखवून ते स्वस्तात मिळतील असे सांगत. “समोरचा व्यक्तीने मोबाईल पसंत करून पैसे देण्याची तयारी दर्शवताच बोलण्यात गुंतवून ठेवून, मोठ्या हातचलाखीने तो मोबाईल घेवून त्यांना एक पाकिट दिले जाई.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “पैसे मिळताच समोरील व्यक्ती पाकीट उघडून बघण्यापूर्वीच ते तिथून त्वरित पळ काढतात. उघडलेल्या पाकिटात व्यक्तीला मोबाईलच्या आकाराची काच मिळून येते.”

३ तारखेला हिरानंदानी परिसरात एका व्यक्तीला अशाच प्रकारे फसवणुकीच्या प्रयत्नात असताना हिरानंदानी कमांडो यांच्या ते नजरेस पडले. याचवेळी गस्तीवर असणारे पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक सुद्धा तिथे पोहचले आणि गडबड लक्षात येताच त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

अटक आरोपी हे प्रसिद्ध इराणी टोळीचे सदस्य आहेत. “त्यांच्याकडून आम्ही ९० रिकामी पाकिटे, काचेचे तुकडे आणि काही महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच अजून कुठे कुठे त्यांनी अशा प्रकारे फसवणूक केली आहे याचा आम्ही शोध घेत आहोत,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

भादवि कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंद करत, त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!