पवई पोलिसांनी पकडला ३७ किलो गांजा; दोघांना अटक

पवई परिसरात मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेल्या ५.५ लाखाच्या गांजासह पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत अमर पवार (२४), सुरेश झोकु गुप्ता (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम ८ (क) सह २० एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात केलेली मुंबई परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिस ठाणे हद्दीत पवई तलाव भागात काही इसम गांजा विक्रीसाठी येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. दोन वेगवेगळी पथके या माहितीच्या आधारावर परिसरात पाळत ठेवून होती.

“गुरुवारी पोलिसांच्या एका खास खबऱ्याने चेक्सचा शर्ट घातलेला एक व्यक्ती येथील व्यापाऱ्यांना आणि बड्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेवून येत असल्याची माहिती दिली होती” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“आम्ही गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महामुनी आणि तडीपार अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळी पथके तयार करून परिसरात पाळत ठेवली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांनी सांगितले.

पाळत ठेवून असतानाच परिसरात पोलीस असल्याची खबर लागताच एक इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. “त्याच्याकडून आम्ही जवळपास ३,१८,००० किमतीचा २१ किलो २०० ग्राम वजनाचा गांजा हस्तगत केला, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी प्रविण महामुनी यांनी सांगितले.

पोलीस चौकशीत त्याने अनिकेत पवार असे त्याचे नाव असून, सुरेश गुप्ता या आपल्या अजून एक साथीदारासोबत हा व्यवसाय चालवत असल्याची कबुली दिली. हिरानंदानी, आयआयटी भागात राहणाऱ्या बड्या ग्राहकांना, विद्यार्थ्यांना आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण – तरुणींना कल्याण येथून तो गांजा विक्रीसाठी आणला असल्याची माहिती त्याने यावेळी पोलिसांना दिलेल्या जवाबात दिली.

अनिकेतने दिलेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांनी त्याचा साथीदार सुरेश गुप्ता याला अटक करून चौकशी केली असता कल्याण येथील घरातून हा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले.

“आम्ही त्याच्या घरी जावून झडती घेतली असता, झोपण्याच्या बेडच्या आतमधील भागात चादरीत लपेटून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील गांजा आम्हाला मिळून आला,” असे याबाबत बोलताना तडीपार अधिकारी लक्ष्मण यादव यांनी सांगितले.

अनिकेत याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचेही याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले.

सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी) बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण महामुनी, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव, पोलीस हवालदार मयेकर, महिला पोलीस हवालदार आशा पाटील, पोलीस नाईक येडगे, पोलीस नाईक पवार, पोलीस शिपाई लाहितकर आणि पोलीस शिपाई जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मन्नूभाई चाळीत महिलेकडून २ किलो ४०० ग्राम वजनाचा गांजा जप्त

पवई पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या एक कारवाईत चांदिवली येथील मन्नूभाई चाळीत राहणाऱ्या महिला नामे हसिनाबाई इस्माईल शेख (६०) कडून पोलिसांनी २.४ किलो गांजा हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक धामुणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक यादव आणि पथक रात्रपाळी गस्त करत असताना सदर महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत ३५००० किंमतीच्या गांजासह १०००० रुपये रोकड हस्तगत केली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to पवई पोलिसांनी पकडला ३७ किलो गांजा; दोघांना अटक

  1. Parth Satam July 19, 2019 at 7:21 am #

    सलाम मुंबई पोलीसांना

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!