३० लाखाचे दागिने चोरी करून पसार झालेल्या इसमास पवई पोलिसांनी ६ तासात ठोकल्या बेड्या

पवईतील ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करून ३० लाख किंमतीच्या दागिन्यांसह पसार झालेल्या एका २६ वर्षीय व्यक्तीला पवई पोलिसांनी अवघ्या ६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. हिरालाल लेहरुलाल कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरालाल यावर्षी २० मे रोजी जामिनावर सुटला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

दोन वर्षापूर्वी जुगारात हरल्याने कर्ज फेडण्यासाठी तो मुंबईत आल्यावर त्याने चोरी केली होती, मात्र तो पकडला गेला. जामिनावर सुटका झाल्यावर पवई येथील ज्वेलरी शॉपमध्ये तो कामास लागला होता. दागिने चोरून आपल्या राजस्थान या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पवई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

बुधवारी पवईतील तुंगागाव येथील ‘रिया गोल्ड’ या सोन्याच्या दुकानाचे मालक अशोक कुमार मंडोत यांनी त्यांच्याकडे काम करणारा इसम हिरालाल कुमावत याने दुकानातील काचेचे शोकेस तोडून त्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पेंडेट, चैन असे एकूण ६७६ ग्राम वजनाचे अंदाजे ३०,४२,००० रुपये किंमतीचे दागिने चोरी केल्याची तक्रार केली होती.

जामिनावर सुटका झाल्यावर हिरालाल १० दिवसांपूर्वीच पवईतील या दुकानात कामाला लागला होता. आपल्यावरील असणारा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तो संधीच्या शोधात होता. बुधवारी दुकानाचे मालक नसल्याचे आणि तो दुकानात एकटाच असल्याचा फायदा घेत त्याने दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करत पलायन केले होते. असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“आरोपीने एका खाजगी ट्राव्हल कंपनीतून एक इनोव्हा कार आपल्या राजस्थान येथील मूळ गावी जाण्यासाठी बुक केल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

सहाय्यक आयुक्त (साकीनाका विभाग) मुकुंद पवार, वपोनि आबुराव सोनावणे, पोनि संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक यश पालवे, विजय पाटील, सुधाकर वेलदोडे, पोलीस हवालदार संतोष देसाई, पोलीस नाईक नितीन खैरमोडे, पोलीस नाईक सचिन गलांडे, पोलीस नाईक बाबू येडगे, पोलीस नाईक ब्रिजेश पवार, पोलीस नाईक प्रदीप जानकर, पोलीस नाईक अभिजित जाधव, पोलीस शिपाई अंबादास चौगुले, पोलीस शिपाई प्रशांत धुरी यांचे एक पथक बनवून तपास सुरु करण्यात आला.

“तांत्रिक माहितीच्या आधारावर पाळत ठेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला आम्ही पालघर, कासा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील यांनी सांगितले.

याबाबत अधिक बोलताना पोलीस निरीक्षक संतोष सावंत यांनी सांगितले की, “खांदेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अशाच एका गुन्ह्यात कुमावत याला अटक करण्यात आली होती. २० मे रोजी त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.”

अटक आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Dear Readers,

We are on Instagram as @avartanpowai

Follow us on Instagram for my post, photos and videos.

https://www.instagram.com/invites/contact/?i=j3nvtost9if2&utm_content=bwuthbl

_______________________________________________________________________________________________________________________

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!