पवईत गांजा विक्रेतीला अटक; २ किलो गांजासह २.३५ लाखाची रोकड जप्त

पवईतील मोरारजी नगर परिसरात राहणारी महिला तिच्या घरासमोर प्लास्टिक पिशवीतून संशयास्पद काहीतरी विक्री करत असताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिच्या पिशवीची झडती घेतली असता तिच्याकडे एकूण २ किलो गांजा आढळून आला. तसेच तिच्याकडून २,३५,८३०/- रुपये रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. अजगरी बेगम सैयद अली (६५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे मुंबईत चालू असणाऱ्या धाडी कायम असून आतापर्यंत त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी धाडी टाकून ७ लोकांना अंमली पदार्थ विक्री करताना अटक केली आहे. ज्यात त्यांनी लाखो रुपयाचे अंमली पदार्थ सुद्धा ताब्यात घेतले आहेत.

पवई पोलिसांनी पाठीमागील आठवड्यापासून पवई परिसरात पायी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा तर बसलाच आहे सोबतच अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

बुधवारी पवईतील फिल्टरपाडा, मोरारजी नगर भागात पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक धमुनसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उप निरीक्षक महामुनी, महिला पोलीस उपनिरीक्षक ढिवरे व अंमलदार परिसरात पायी गस्त घालत असताना एक महिला प्लास्टिक पिशवीतून संशयास्पदरित्या काहीतरी विक्री करत असल्याचे आढळून आले.

‘पोलिसांनी तिच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात २ किलो गांजा आणि विक्रीतून मिळालेली २.३५ लाखाची रक्कम पोलिसांना मिळून आली,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

पवई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८ (क), २० नुसार गुन्हा नोंद करून आरोपी महिला अजगरी बेगम हिला अटक करून अधिक चौकशी केली असता तिला यापूर्वीही अशाच गुन्ह्यात अनेकदा अटक झाल्याचे समोर आले आहे.

पवई पोलिसांनी पायी गस्तीच्या वेळी निर्जन स्थळे आणि पडक्या इमारतीच्या ठिकाणी केलेल्या तपासात गोखले नगर, रमाबाई नगर आणि तिरंदाज व्हिलेज भागात राहणारे ६ तरुण नशा करताना आढळून आले होते ज्यांच्यावर सुद्धा मुंबई दारूबंदी कायदा कलम ८५ (१) नुसार कारवाई केली आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!