सोनसाखळी चोराला तुटलेल्या आरशावरून पवई पोलिसांनी केली अटक

अरबाज कुतुबुद्दीन अत्तर

हिरानंदानी परिसरात आपल्या मित्रांसोबत आलेल्या एका तरुणाची सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पवई पोलिसांनी केवळ मोटारसायकलच्या तुटलेल्या आरशावरून अटक केली आहे. अरबाज कुतुबुद्दीन अत्तर (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईत विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.

भांडूप येथे राहणारा २० वर्षीय तरुण यशपाल बालोर आपल्या मित्रांसोबत २९ नोव्हेंबर रोजी हिरानंदानी येथे फिरण्यासाठी आला होता. हिरानंदानी येथील सायप्रेस इमारतीजवळ आपल्या मित्रांसोबत चहा पित उभा असताना सावजाच्या शोधात असणाऱ्या एका अज्ञात तरुणाने मोटारसायकलवरून येत त्याच्या जवळील सोन्याची चैन चोरून पोबारा केला होता.

“आम्हाला घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याने पिवळ्या रंगाची होंडा डीओ मोटारसायकल वापरली असून, तिचा आरसा तुटलेला असल्याचे समोर आले होते,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस पनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

गुन्ह्याचा तपास सुरु असताना संशयित इसम हा अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. तुटलेल्या आरशाच्या डीओ मोटारसायकलचा शोध सुरु असताना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांनी अरबाज याला २ फेब्रुवारीला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

“अटक आरोपीकडून आम्ही चोरीस गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे,” पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!