वाहनचालकांची फसवणूक करणाऱ्या बनावट मॅकेनिकला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तुमच्या गाडीतून धूर निघत आहे असे सांगून, गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने अनेक मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या बनावट मॅकेनिकच्या पवई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात काल मुसक्या आवळल्या. झाहिद नुर मोहमद शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोवंडी येथील रफिकनगर भागातून त्याला अटक करण्यात आली.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर टकटक गँग सोबतच, तुमच्या गाडीतून धूर निघत आहे असे सांगून गाडी दुरुस्त करण्याच्या नावावर वाहन धारकांकडून हजारो रुपये उकळणारी एक टोळी सक्रीय झाल्याची तक्रार पवई पोलिसांना मिळाली होती. वारंवार घडणाऱ्या घटना पाहता पवई पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक विशिष्ट पथक तयार करून याचा तपास सुरु केला होता.

‘शेख सिग्नल भागात जुन्या वाहनांना लक्ष ठेवून असे. एखादे जुने वाहन हेरून ते सिग्नलवर थांबताच तो वाहन धारकांना सांगत असे की, गाडीतून धूर निघत आहे, गाडी पेटू शकते. तो एक मॅकॅनिक आहे आणि तो या समस्येचे निराकरण करू शकतो. गाडी खोलून वायरिंगमध्ये झेडझाड करत स्पार्क करून गाडीतून धूर निघाल्याचे दाखवत गाडीतील मोठा पार्ट गेल्याचे सांगे. वायरिंग पूर्ववत करून पार्ट बदलल्याचे सांगत वाहनधारकाकडून मोठी रक्कम उकाळे,’ असे शेख याच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना पवई पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे यांनी सांगितले.

‘आरोपीने अनेक मुंबईकरांना आपल्या या कार्यपद्दतीने प्रत्येकी ५००० ते १०,००० रुपयांचा गंडा घातला आहे. त्याने पवईसह वाकोला, सांताक्रूझ, कुर्ला, देवनार, डोंगरी या भागात सुद्धा अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

शेखसोबत अजूनही काही जणांचा यात सहभाग असल्याची शक्यता आहे. त्याला भादवि कलम ५११, ३४ नुसार अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!