हरिओमनगर येथे पार्किंगच्या वादातून मारहाण करून पसार झालेल्या ‘थापा’ला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाठीमागील आठवड्यात आयआयटी पवई येथील हरिओम नगर येथे मोटारसायकल पार्किंगवरून झालेल्या वादानंतर, सुखदेव खडका उर्फ थापा (३६) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी मिळून शैलेश सिंग (३४) याला मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी शैलेश याचा मृत्यू झाल्यानंतर ऐश्वर्याला अटक करण्यात आली होती, तर मृत्यूची बातमी समजताच थापा पसार झाला होता. पवई पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली.

गुरुवारी,१५ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हरिओम नगर येथे राहणारे सुखदेव खडका आणि शैलेश सिंग यांच्यात पार्किंगवरून वाद झाला होता. ‘शैलेशने सुखदेव याला त्याची मोटारसायकल येणा-जाणाऱ्या लोकांचा रस्ता अडवत असल्याचे सांगितल्यानंतर तो घरी गेला आणि आपल्या पत्नीला घेऊन परत आला. दोघांनी बेल्ट आणि बांबूने मारहाण करून मला जबरदस्त जखमी केले, असे पोलीस जवाबात शैलेश याने सांगितले.

शैलेशचा उजव्या हाताच्या करंगळीला आणि डोक्याला दुखापत झाली होती. उपचारानंतर जवाब नोंदवून घेऊन शुक्रवारी सकाळी ६ वाजता पोलिसांनी त्याला घरी जाण्यास सांगितले होते.

‘घरी असताना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शैलेशला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे याबाबत माध्यमांशी बोलताना त्याचा लहान भाऊ अमरजित याने सांगितले.शैलेशचा मृत्यू झाला असल्याचे माहित पडताच सुखदेव याने घरातून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी त्याची पत्नी ऐश्वर्याला अटक करून त्याचा शोध सुरु केला होता. आठवडाभर अटक टाळण्यासाठी पळत असणाऱ्या थापाला पवई पोलिसांनी अखेर शुक्रवारी अटक केली.

भादंवि कलम ३२६, ५०४ सह ३४ नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ऐश्वर्याला पूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

शैलेशचा मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूस आरोपी जोडी जबाबदार असून, त्यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी परिवाराच्या नेतृत्वाखाली पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. ‘प्राथमिक वैद्यकीय अहवालात शैलेशचा मृत्यू हा हृदयविकारामुळे झाला असल्याचे समोर येत आहे, ना कि त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेमुळे. शस्त्रक्रिया अहवाल अजून येणे बाकी आहे, त्यामुळे दोघांवर आत्ताच खुनाचा गुन्हा नोंद करता येणार नाही,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!