पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला धूम स्टाईलने अटक

पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला धूम स्टाईलने अटक

पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका टोळीच्या सदस्यांचा पवई पोलिसांनी धूम स्टाईलने पाठलाग करत टोळीतील २ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. परिसरात आपला सावज गाठण्यापूर्वीच पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. पुढील चौकशीसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कोरोना काळात शांत झालेल्या चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध भागात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची आकडेवारी दररोज समोर येत आहे. अशावेळी या चोऱ्यांना रोखण्यासोबतच चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. पवई परिसरात सुद्धा अशा घटना वाढत असल्याने विविध पथके तयार करून पहाटे आणि रात्रीच्या काळात परिसरात गस्त घातली जात आहे.

“सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी आमची पथके परिसरात गस्त घालत असतानाच इराणी टोळीतील काही तरुण फसवणुकीच्या बहाण्याने परिसरात येणार असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचे ४ सदस्य एमआयडीसी परिसरातून पवई परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही आयआयटी मेनगेटजवळील भागात सापळा लावून बसलेलो असताना सांगितलेल्या वर्णनाची लोक मोटारसायकलवरून येत असल्याचे दिसले. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धूम ठोकताच आम्ही २ टीम बनवून मोटारसायकलवरून पाठलाग करत टोळीच्या दोन सदस्यांना साकीविहार रोडवर गाठत ताब्यात घेतले.” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड यांनी सांगितले.

“पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना ठगणारी एक मोठी इराणी टोळी मुंबई परिसरात कार्यरत आहे. यातील अनेक लोकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकून आत टाकले आहे. मात्र कोरोना काळात सुटका झालेल्या काही आरोपींमध्ये यांचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे बाहेर येताच या टोळीच्या लोकांनी पुन्हा मॉर्निंग वॉकर्स, ज्येष्ठ नागरिक यांना टार्गेट करणे सुरु केले आहे. पवईच्या हद्दीत या टोळीचे काही सदस्य येत असल्याची माहिती मिळताच पवई पोलिसांच्या पथकाने मोटारसायकलवरून पाठलाग करत त्यांना घेरून अटक केली. त्यांच्या परिसरात जावून त्यांना अटक करणे जेवढे अवघड आहे तेवढेच त्यांना मोटारसायकलवर असताना पकडणे अवघड असते. मात्र पवई पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“अटक दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, सोनसाखळी चोरी सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय दळवी यांनी सांगितले.

अटक आरोपी हे चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याने न्यायालयीन कोठडीत होते. जवळपास दीड वर्ष कोठडीत घालवल्यानंतर नुकतीच त्यांची कोठडीतून सुटका झाली होती. आपल्या कामाला पुन्हा सुरुवात करताच पोलिसांनी पुन्हा त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत”, असेही पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!