ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करणाऱ्या ठगाला दिल्लीतून अटक

ऑनलाईन मैत्री करत चांदिवली येथील एका खाजगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला विदेशातून आलेल्या महागड्या वस्तूवरील टॅक्स भरण्यासाठी पैशांची मागणी करून, फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दिल्लीतून अटक केली आहे. सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) असे अटक आरोपीचे नाव असून, एक महिला सहकारी नेहा माथूर आणि नायजेरिन नागरिकाच्या मदतीने गुन्हा करत असल्याचे समोर आले आहे. सत्येंदर विरोधात दिल्लीत गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या अटकेमुळे मुंबईतील अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

तक्रारदार तरुणी चांदिवली येथील एका खाजगी बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. मैत्री जुळणाऱ्या ऑनलाईन वेबसाईटवर पाठीमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिची मॅनसन रॉड्रिक्स नामक तरुणाशी मैत्री झाली. दोघांच्यात झालेल्या चॅटमध्ये तिने रॉड्रिक्सला आपल्या खाजगी आयुष्य आणि नोकरीबद्दल सुद्धा माहिती दिली होती. तर रॉड्रिक्सने तो इटलीचा नागरिक असून, एका खाजगी शिप कंपनीत उच्च पदावर कार्यरत असल्याबाबत आपली ओळख तक्रारदार महिलेशी करून देताना तिचा विश्वास संपादन करून जवळीक निर्माण केली होती.

त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यानंतर दोन महिन्यांनी डिसेंबर महिन्यात त्याने तक्रारदार महिलेला फिनलँडमधून काही वस्तू खरेदी केल्या असून, तो तिला पार्सलने पाठवत असल्याचे सांगितले.

‘काही दिवसातच तिला नेहा माथूर नामक एका महिलेने फोन करून, ती दिल्ली येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगत तक्रारदार महिलेच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये असणारे सोन्याचे दागिने, महागडी घड्याळ आणि काही विदेशी चलनाच्या बदल्यात टॅक्स भरण्यास सांगण्यात आले’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, ‘नेहाने दिलेल्या अकाउंटमध्ये तक्रारदार महिलेने टप्प्या टप्याने जवळपास पावणेचार लाख भरल्यानंतरही तिला तिचे पार्सल मिळाले नसल्याने तिने नेहाकडे याबाबत चौकशी केली असता तिने अजून रक्कम भरण्याची मागणी केल्यानंतर संशय आल्याने तिने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

‘तपासात आम्हाला तक्रारदार महिलेने भरलेली रक्कम ही दिल्ली येथून काढली गेल्याची माहिती समोर आल्यानंतर आम्ही तांत्रिक पुरावे जमा करून सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) याला सोमवारी दिल्लीतून अटक केली’ असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांनी सांगितले.

भादंवि कलम ४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) व (ड) नुसार गुन्ह्यात अटक करून मंगळवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले असता २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सत्येंदर सिंह याच्यावर दिल्लीमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची एका नायजेरिन नागरिकाशी ओळख झाली होती. त्याच्या मदतीनेच त्याने फसवणुकीचा धंदा सुरु केला आहे. युको, इंडियन, कॅनरा आणि पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात रक्कम जमा केली जात होती. बँकेत जमा होणारे पैसे काढण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

नायजेरिन नागरिकासोबतच सदर गुन्ह्यात स्वतःला कस्टम अधिकारी भासवणाऱ्या नेहा माथुरचा पवई पोलीस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!