विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वईमध्ये कार्यालय असणाऱ्या एका नामांकित विकासकाला २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करून, २ करोड रुपयाची रक्कम स्विकारताना एका खंडणीखोराला आज (बुधवारी) पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुलाब पारखे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जुन्नर, पुणे येथे जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही समोर येत आहे. पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून पारखे याला अटक केली असून, उद्या (गुरुवारी) त्याला स्थानिक कोर्टात हजर केले जाईल.

पवईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या नामांकित विकासकाबाबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून, माहिती मिळवून, माहिती लपवण्यासाठी विकासकाकडे सतत खंडणीच्या पैशांची मागणी केली जात होती. पैसे दिले नाही तर सगळी माहिती उघड करून विकासकाला अडचणीत आणण्याची धमकी सुद्धा दिली जात होती.

“काही महिन्यांपूर्वीच १० लाख रुपये देण्यात आले होते, मात्र तेवढ्यावर त्याचे समाधान होत नव्हते. त्याच्याकडे असणारी माहिती उघड न-करण्यासाठी विकासकाकडे २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करत, मान्य करण्यास नकार दिल्यास मिडियाकडे जाण्याची धमकी दिली होती” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळी विकासकाच्या कार्यालयातून अधिकृत व्यक्तीने याबाबत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्ह्याची नोंद केली होती. सोबतच त्याने खंडणीची मागणी करणारे ऑडिओ सुद्धा पवई पोलीस ठाण्यात पुरावा म्हणून सादर केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, कर्तव्यावर असणारे अधिकारी यांच्या नेतृत्वात एक टिम बनवून, सापळा रचून खंडणीखोर गुलाब पाखरे यास मुलुंड येथील एका हॉटेलमधून खंडणीची २ करोडची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘अटक आरोपी गुलाब पारखे हा जुन्नर, पुणे येथून जिल्हा परिषद सदस्य आहे. तो पूर्वी त्याच विकासकाकडे लायजनिंग एजेंट म्हणून बरेच वर्ष कामकाज पाहत होता. गेल्या वर्षी त्याने येथून नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ज्यानंतर विविध सरकारी कार्यालयात विकासकाविरोधात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली होती. ती माहिती लपवण्यासाठी तो २० करोडच्या खंडणीची मागणी करत होता’ असे याबाबत बोलताना अजून एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुन्ह्यात वापरलेली फोर्चूनर कार सुद्धा पवई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पारखे याने विकासक याच्याकडील नोकरी का सोडली? त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते का? विकासकाबद्दल काही कारणाने त्याच्या मनात काही राग होता का? विकासकाच्या आर्थिक स्थितीची माहिती असल्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठीच त्याने हे कृत्य केले आहे का? या सर्व दृष्टीने सुद्धा तपास करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ (खंडणी) नुसार गुन्हा दाखल करून पारखे याला अटक केली असून, उद्या त्याला कोर्टासमोर हजर केले जाईल.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!