पवई तलाव भागात नशा, अश्लील वर्तन करणाऱ्यांवर पवई पोलिसांची कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गस्त

पवई तलाव भागात नशा, अश्लील वर्तन करणाऱ्यांवर पवई पोलिसांची कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गस्त

पवई तलाव परिसरात नशा करणाऱ्या, अश्लील वर्तन करणाऱ्या, गैरप्रकार करणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पवई पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. पवई तलाव भागात चालणारे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी पवई पोलिसांनी आता ठोस पाऊले उचलली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पवई तलाव भागात दररोज पायी गस्त घालण्यात येत आहे. यावेळी तलाव भागात गैरप्रकार, नशा आणि अश्लील वर्तन करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पवई तलाव परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. मात्र, येथे काही नागरिक नशा करत असल्यामुळे, जोडप्यांच्या अश्लील वर्तनामुळे आणि गैरप्रकारामुळे पर्यटकांवर त्याचा परिणाम जाणवत होता. कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांनी हळूहळू याकडे पाठ फिरवली होती.

येथे फिरण्यासाठी येणारे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीची दखल घेत पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी ठोस पाऊल उचलत या परिसरात पायी पोलीस गस्त सुरु केली आहे. दररोज मोठ्या फौजफाट्यासह या परिसरात गस्त घालत गैरप्रकार आणि नशेखोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात चालणारे गैरप्रकार आणि नशेखोरीला चांगलाच आळा बसला आहे.

पवई तलाव भागात नशा, अश्लील वर्तन करणाऱ्यांवर पवई पोलिसांची कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गस्त

राखीव पोलीस दलाच्या मदतीने दिवसभर या परिसरात गस्त घातली जाते. संध्याकाळी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (Police Inspector), सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector), पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector), पोलीस हवालदार आणि शिपाई (Police Constable) असा मोठा फौजफाटा घेवून ही गस्त घातली जाते. यावेळी गैरवर्तन करणाऱ्या आणि नशा करणाऱ्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येते.

“पवई तलाव भागात चालणाऱ्या गैरप्रकार आणि नशाखोरांबाबत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी पाहता सुरक्षेसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आम्ही पवई तलाव परिसरात पायी गस्तीला सुरुवात केली आहे. यावेळी आम्ही नागरिकांशी संपर्क साधत त्यांच्या कायदा सुव्यवस्थेशी निगडीत समस्या जाणून घेत आहोत,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गस्तीच्या काळात तलाव परिसरात विना मास्क आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

“पोलिसांनी सुरु केलेल्या या गस्तीमुळे आता नशेखोराना चांगलाच आळा बसला असून, गैरप्रकार सुद्धा कमी झाले आहेत. मात्र तलाव परिसर हा सर्वांसाठीच आहे, केवळ जोडप्यांसाठी नाही; याचे भान जोडप्यांना असणे आवश्यक आहे. त्यांच्या येथे बसण्यावर बंधन नाहीच, त्यांनी येथे अश्लील वर्तने करून नयेत एवढीच साधारण अपेक्षा आहे,” असे मत यावेळी बोलताना काही नागरिकांनी व्यक्त केले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!