महागडा मोबाईल घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकाचा पवई पोलिसांनी १२ तासात लावला छडा

मोबाईल घेवून पसारपवई परिसरात प्रवास करत असताना एका तरुणीचा रिक्षात विसरलेला फोन घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पवई पोलिसांनी १२ तासात शोधून काढले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी रिक्षात विसरलेला ९० हजार किंमतीचा महागडा मोबाईल तक्रारदार महिलेला परत मिळवून दिला आहे.

मंगळवारी, हिरानंदानी परिसरात राहणाऱ्या रचिता डावर  हिरापन्ना मॉल ते हिरानंदानी गार्डन्स येथील आपल्या राहत्या घरी रिक्षाने प्रवास करत असताना ‘सॅमसंग एस नोट २०’ (अंदाजे किंमत ९०,०००) मोबाईल फोन हा रिक्षातच पडला. घरी जात असताना आपला मोबाईल जवळ नसल्याचे लक्षात आल्यावर धावत बाहेर येवून त्यांनी पाहिले असता रिक्षा तिथून निघून गेली होती. त्वरित पवई पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली.

“आम्ही महिलेने प्रवास केलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासणी केली असता रिक्षाचा अस्पष्ट नंबर आम्हाला मिळून आला होता. टेक्निकल मदतीने रिक्षाचा नंबर स्पष्ट करून ‘रिक्षा क्रमांक एमएच ०२ एफबी ०१०६’च्या मालक रणजीत सिंग यांना सिद्धार्थ नगर बांद्रा येथून शोधून काढले.” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार काळे यांनी सांगितले.

सिंग याच्याकडे चौकशी केली असता त्याला असा कोणताही मोबाईल मिळाले नसल्याचे त्याने सांगितले. मात्र ही रिक्षा तो इरफान खान नामक व्यक्तीला चालवायला देत असल्याची माहिती मिळाली. “मालकाने दिलेल्या माहितीच्या आधारावर खान याला जोगेश्वरी प्रेमनगर येथून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने असा कोणताही मोबाईल मिळाला असल्याचे स्पष्ट नाकारले. मात्र पोलिसी प्रेम दाखवताच त्याने तो मोबाईल त्याच्या ताब्यात असल्याची कबुली दिली,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

पोलिस उप निरीक्षक तुषार काळे यांच्यासह पोलीसनाईक ब्रिजेश पवार, पोलीसनाईक खैरमोडे, पोलीस शिपाई अभिजित जाधव, पोलीस हवालदार देसाई यांनी अथक परिश्रम करत १२ तासाच्या आत महागडा मोबाईल घेवून पसार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध लावत, मोबाईल हस्तगत केला आहे.

“आमच्या पथकाने रिक्षात विसरलेला मोबाईल मोठ्या कुशलतेने तपास करून परत मिळवत त्याच्या मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे,’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांनी सांगितले.

, , , , , , , ,

One Response to महागडा मोबाईल घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकाचा पवई पोलिसांनी १२ तासात लावला छडा

  1. Planet Powai February 13, 2021 at 9:11 am #

    Shabbas Powai Police

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!