डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या

पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे.

फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता साकीविहार रोडवरील जॉन बेकर बसस्टॉपजवळ, आपला डंपर क्र. एमएच ०४ जेयु ४५७७ पार्क करून ठेवला होता. ८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ते तिथे गेले असता डंपर तिथे नसून, कोणीतरी चोरी केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी ८ सप्टेंबरला पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे आणि पो. नि. हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उप निरिक्षक विनोद लाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह. मोहोळ, पो.शि. देशमुख व पो.शि. भोये यांचे एक विशेष पथक बनवत तपास सुरु करण्यात आला.

“अशा प्रकारचे चोरी गेलेले डपंर तात्काळ धुळे, यवतमाळ या ठिकाणी नेवुन त्यांची विल्हेवाट लावली जाते अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे डपंर त्याच दिशेने गेला असल्याची शक्यता पाहता तपासी पथक डंपरचा क्लिनर श्री हाफिजुर्र रहमान इक्बाल हुसैन यांना सोबत घेऊन मुंबई नाशिक हायवेने शोध घेणेकामी रवाना झाले,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चोरीस गेलेला मोटार डंपर हा मुंबई नाशिक हायवेवर आसनगाव येथील परिवार गार्डन हॉटेल समोर उभा असल्याचा पोलिसांना दिसून आला. सदर ठिकाणी सापळा रचून डंपर घेवून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आरोपी नामे पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी याला नमुद गुन्ह्यात ताब्यात घेतले.

पोलिसांनी अटक आरोपीकडून चोरीस गेलेला डंपर हस्तगत केला आहे. त्याचा अजून किती गुन्ह्यात सहभाग आहे, पुढे हा डंपर कुठे आणि कुणाला विकला जाणार होता? याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!