पवईत अनैतिक स्पावर पोलिसांची कारवाई, ४ मुलींची सुटका

प्रातिनिधिक

वईतील चांदिवली फार्म रोडवरील एका मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर अनैतिक रित्या चालणाऱ्या स्पावर पवई पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत, चार मुलींची सुटका केली. स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या त्याचा मालक आणि मॅनेजर अशा दोघांना पवई पोलिसांनी भादवि आणि पीटा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे.

याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खास सूत्रांकडून पवईतील लेकहोम, लेक प्रिमरोज इमारतीत शॉप क्रमांक १०२, १०३ मध्ये सुरु असणाऱ्या क्रिस्टल थाई स्पा येथे स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. ज्याच्या आधारावर त्यांनी एक डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी खरोखरच देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची खात्री केली.

‘मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आमच्या एका खास सूत्राला आम्ही खोटा ग्राहक बनवून स्पामध्ये पाठवले होते. त्यावेळी तिथे मुली उपस्थित असल्याची माहिती त्याने आम्हाला दिल्यानंतर आम्ही धडक त्या स्पावर छापा मारत सर्वाना ताब्यात घेतले’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘आम्ही तेथून चार मुलींची सुटका करत त्यांना सुधारगृहात पाठवले आहे. स्पाचा मालक सुनील कुंदर (३८) आणि मॅनेजर रमेश पवार (३०) दोघांना स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय करत असल्याच्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते आणि टीम यांनी ही कारवाई केली.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३७० (३) सह पीटा कायदा कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता २८ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes