नशेखोराने अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका; पवई पोलिसांची कारवाई

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा शोध घेवून अपहरण करणाऱ्या नशेखोर तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकून साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस नाईक घोडेकर आणि पोलीस शिपाई साळुंखे, चौकटीत अपहरण करण्यात आलेला मुलगा

साकीनाका येथून अपहरण झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलाची वीस वर्षीय नशेखोराच्या तावडीतून पवई पोलिसांनी सोमवारी सुखरूप सुटका केली. रात्री गस्तीवर असणाऱ्या पवई पोलिसांच्या बीट मार्शलची नजर एका नशेखोराजवळ असणाऱ्या लहान मुलावर पडली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. मोहम्मद इर्शाद माजिद खान असे अपहरण करणाऱ्या नशेखोराचे नाव असून, आसद सलीम शेख (८) याचे अपहरण करण्याच्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हा नोंद करायला गेल्यावर दुसऱ्याच्या हद्दीत असल्याचे सांगून फेऱ्या मारायला लावणारे आरोप पोलिसांवर केले जातात. मात्र हे सत्य नसून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही पोलीस ठाण्याची हद्द आडवी येत नसते याचे जिवंत उदाहरण पवई पोलिसांनी नुकतेच दिले आहे. त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा शोध तर काढलाच, शिवाय त्याचे अपहरण करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकून साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

साकीनाका येथील काजूपाडा येथे राहणारा ८ वर्षीय आसद शेख घराच्या बाहेरून गायब झाला असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी रविवारी साकीनाका पोलीस ठाण्यात दिली होती.

आरोपी मोहम्मद इर्शाद माजिद खान

सोमवारी पवई पोलीस ठाण्यात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस नाईक घोडेकर आणि पोलीस शिपाई साळुंखे नियमित प्रमाणे बीट मार्शल एकवरून पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. ‘अशोकनगर भागात गस्त घालत असताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास अंधाऱ्या भागात एका नशेखोरासोबत एक लहान मुलगा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित दोघांना ताब्यात घेवून चौकशी केला असता मुलाने तो साकीनाका येथे सायकलवर घरासमोर खेळत असताना त्या तरुणाने त्याला पळवून आणले असल्याचे सांगितले ’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

तरुणाला आणि मुलाला पोलीस ठाण्यास आणून चौकशी केली असता नशेखोराने आपले नाव मोहम्मद इर्शाद माजिद खान असे असल्याचे सांगितले. तर मुलाने आपले नाव आसद सलीम शेख असल्याची माहिती दिली. माहितीची शहानिशा करण्यासाठी पवई पोलिसांनी साकीनाका पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता दोन दिवसांपूर्वी आसदच्या पालकांनी मुलगा हरविल्याची तक्रार केले असल्याचे समोर आले.

पवई पोलिसांनी आरोपी तरुण इर्शाद खान आणि मुलाला साकीनाका पोलिसांच्या स्वाधीन केले असून, मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‘गस्तीवर असणाऱ्या आमच्या पोलीस नाईक घोडेकर आणि पोलीस शिपाई साळुंखे यांनी समय सूचकता दाखवत, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी मुलाची सुटका करत एक उत्तम कार्य केले आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

खानच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने मुलाचे अपहरण नक्की कशासाठी केले होते याबाबत वेगवेगळी उत्तरे देत असून, नक्की उद्देश काय होता याचा साकीनाका पोलीस तपास करत आहेत.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes