पवई पोलिसांनी वाचवले ब्रिटिश नागरिकाचे प्राण, ब्रिटिश हाय कमिशनकडून कौतुक

नैराश्यात असणारा एक ब्रिटिश नागरिक आत्महत्येच्या प्रयत्नात असताना, दीड तास दरवाजातील पत्र टाकण्यासाठी असणाऱ्या जागेतून त्याची मनधरणी करत, पवई पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सॅम कॉलर्ड (६०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले होते असे समोर आले आहे. याबाबत ब्रिटिश हाय कमिशनने पवई पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जूनला पवई पोलिसांना कंट्रोल रुममधून एक ब्रिटीश नागरिक हिरानंदानी भागातील टोरीनो इमारतीच्या २१ व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र त्या इमारतीत अशी कोणी व्यक्तीच नसल्याची माहिती मिळाली.

“मी माझ्या एका ओळखीच्या इसमाला जो त्या इमारतीत राहतो त्याला फोन लावून कोणी ब्रिटीश नागरिक त्या इमारतीत राहत आहे का? याची माहिती विचारली, मात्र त्याने असा कोणी व्यक्ती इथे राहत नाही, मात्र बाजूची एव्हेलोन इमारत ३३ मजल्याची असल्याची माहिती आम्हाला दिली” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

एव्हेलोन इमारतीत चौकशीत एक ब्रिटीश नागरिक त्या इमारतीत ३३ मजल्यावर राहत असून, त्याचे वागणे काही दिवसापासून बदलले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, अनघा सातवसे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाघ, पोलीस शिपाई राम हांडे, नवनाथ जावळे यांच्या पथकाने त्वरित त्याच्याकडे धाव घेतली.

“आम्ही तिथे गेले तेव्हा घर आतून लॉक होते. ब्रिटिश नागरिक असलेले सॅम एकटेच त्या घरात राहत होते. आम्ही त्यांना दरवाजा उघडण्याची विनंती केली मात्र ते दरवाजाच उघडत नव्हते. दरवाजाला पत्र टाकण्यासाठी असणाऱ्या छोट्या जागेतून आम्ही त्यांना जवळपास ९० मिनिटे विनवण्या करत होतो. अखेर आमच्या त्या विनवण्यांना यश आले आणि त्यांनी दरवाजा उघडला,” असे याबाबत माध्यमांशी बोलताना साकीनाका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.

सॅम अंधेरी येथील अमेरिकन कंपनीमध्ये कामाला आहेत, तर त्यांची पत्नी ऑस्ट्रेलिया, सिडनी येथे राहते. आठ महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, ज्यानंतर ते नैराशेत होते. २७ जूनला सॅमने आपल्या पत्नीला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. तिने याची माहिती ब्रिटिश हाय कमिशनला देताच त्यांनी पवई पोलिसांना कळविले होते.

“दरवाजा उघडल्यानंतर सुद्धा ते दवाखान्यात जायला तयार नव्हते. बराचवेळ समजूत घातल्यानंतर त्यांनी पोलीस वाहनातून दवाखान्यात येण्यास संमती दर्शवली,” असे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली.

त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती समजताच ब्रिटिश हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलासह त्यांची भेट घेवून विचारपूस केली. पवई येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन सॅमची विचारपूस केली. पवई पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानासाठी पोलीस ठाण्याला जावून भेट घेवून, पवई पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!