भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेर्धात पवईत आंदोलन

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेर्धात पवईत विविध संघटना आणि पक्षांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ११ डिसेंबरला जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड चौकात हे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, धडक कामगार युनियन, अखिल भारतीय महिला संघटना अशा विविध पक्ष, संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते राहुल गच्छे, राजू इंगळे, वंचित बहुजन आघाडी विक्रोळी विधानसभा सचिव सुनील सोनावणे, सचिन नवगिरे, रवी मोरे, संजय इंगळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई संघटक सतिश ईनकर, वॉर्ड अध्यक्ष नितीन गाडे, डिवायएफआय मुंबई अध्यक्ष महेंद्र उघडें, तालुका अध्यक्ष बाळू पंडागळे, पवई माजी अध्यक्ष हरी गाडगे, शैलेंद्र चव्हाण, रत्ना वाघमारे, धडक कामगार युनियन मुंबई सचिव प्रकाश निकम, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक इंगोले, अखिल भारतीय महिला संघटना अध्यक्षा संगीता सोनावणे, रिपब्लिकन युवा मुंबई अध्यक्ष भीमराज भाई जगताप, योगेश शिंदे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे राजू पंडागळे, उत्तम पंडागळे आंदोलनात सहभागी झाले होते.

“भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महापुरुषांची सातत्याने बदनामी केली जात आहे. यात चंद्रकांत पाटलांची भर पडली आहे. पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. महापुरुषांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करुन घेणार नाही,” असे याबाबत बोलताना आंदोलकांनी सांगितले.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र मुंबई पोलिसांना दिले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!