आवर्तन पवई इम्पॅक्ट: पालिकेने ८ तासात दुरुस्त केला रामबागचा रस्ता

वईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या आवर्तन पवईचा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. पवई रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारती समोर पेवरब्लॉक उखडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे आवर्तन पवईने ट्विट आणि फोनवरील तक्रारीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर केवळ ८ तासाच्या आत पालिकेने रस्ता दुरुस्त करून घेतला आहे.

पवईतील रामबाग येथील डी पी रोड नंबर ९ वर क्रिस्टल पॅलेस इमारती समोर रस्त्याचे संपूर्ण पेवरब्लॉक उखडून मोठमोठाले खड्डे तयार झाले होते. विशेष म्हणजे प्रभाग फेररचनेमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११६, ११७, ११८ आणि १२२ अशा चारही प्रभागातील उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हा परिसर चारही निवडून आलेल्या नगसेवकांच्या अखत्यारीत येतो. तरीही गेल्या महिनाभरापासून एकही नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही.

“आम्ही याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यांनी काही यात लक्ष घातले नाही” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना बाजूलाच असणाऱ्या चाळीतील काही नागरिकांनी सांगितले.

डी पी रोड नंबर ९ हा चांदिवली आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जोडणारा एकमेव दुवा आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. त्या सर्वांना या खड्यातूनच प्रवास करावा लागत होता.

मंगळवारी आवर्तन पवईच्या निदर्शनात ही बाब येताच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून “चार चार नगरसेवक असून रामबागच्या रस्त्यांची ही दुरावस्था” असे फोटोसह ट्विट करून पालिकेचे याकडे लक्ष वेधले होते. तेवढ्यावरच न-थांबता त्यांनी पालिका ‘एस’ विभाग आणि पालिका ‘एल’ विभाग यांना फोनवरून सुद्धा याची माहिती देवून त्वरित दुरुस्तीची मागणी केली होती.

पालिकेने रात्री रहदारी बंद होताच नवीन पेवरब्लॉक लावून आणि रेती टाकून रोड दुरुस्त करून घेतला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह डी पी रोड नंबर ९ प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांचा प्रवास सुखकर झाला आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes