इराणी टोळीच्या सदस्याला आंबिवलीतून अटक; साकीनाका, पवई पोलिसांची संयुक्त कारवाई

पवई, साकीनाका भागात सीबीआय ऑफिसर आणि पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या इराणी टोळीच्या एका सदस्याला कल्याणमधील आंबिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. जाफर अली असिफ अली सय्यद (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साकीनाका आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झाला आहे, पोलीस बंदोबस्त आहे तुमच्या जवळील दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगत हातचलाखीने त्यांचे दागिने घेवून पसार होणारी टोळी पवई, साकीनाका परिसरात कार्यरत झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माहिती मिळवली असता कल्याण येथील आंबिवली भागातील इराणी टोळीचे हे काम असल्याचे समोर आले होते.

“या टोळीचे मेंबर गुन्हा करून त्वरित त्यांच्या आंबिवली येथील परिसरात पसार होत असे. गुन्हेगारांना त्यांच्या परिसरात जावून अटक करण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नव्हता. मात्र त्यांच्या परिसरात घुसणे म्हणजे जिवावर उदार होणे. आंबिवलीत कारवाईसाठी गेलेल्या अनेक पोलिसांवर यापूर्वी अनेकदा हल्ले झाले आहेत,” असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी २८ मे रोजी सकाळी हिरानंदानी येथील आपले बँकेचे काम संपवून ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. एसएमशेट्टी शाळेजवळ एका व्यक्तीने त्यांना थांबवून आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून, मोठ्या साहेबांनी बोलावले आहे असे त्यांना सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला माहिती आहे ना बाहेर काय स्थिती आहे. दागिने घालून का फिरताय? असे म्हणत दागिने काढून पिशवीत ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने लांबवले होते.

तर दुसऱ्या एका घटनेत, पवईतील मिलेनिअम टॉवरमध्ये राहणाऱ्या अर्चना विजय जोशी (७२) या वृद्ध महिला आयआयटी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या असताना आपण सीबीआय ऑफिसर असल्याची बतावणी करून, महिलेकडील ८ तोळ्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना ०५ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १ वाजता घडली होती. याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळवत दोन्ही गुन्ह्याचा पवई पोलीस तपास करत होते.

साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी याबाबत साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत ठोस पाऊले उचलण्याचा आदेश दिला होता.

पोलिसांच्या खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सपोआ मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) माने यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथकासह आंबिवलीत जावून पोलिसांनी कारवाई करत जाफरला अटक केली.

“यावेळी आमच्या पथकावर तेथील स्थानिक महिलांनी हल्ला चढवत आमच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र समय सूचकता दाखवत आम्ही मोठ्या शिताफीने जाफरला ताब्यात घेतले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“जाफरने पवईतील दोन तर साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या आम्ही त्याच्याकडे अधिक तपास करत आहोत,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

जाफर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याचे वडील असिफ शाबीर सय्यद (६०) याच्या सोबत अशाच अनेक गुन्ह्यात तो सहभागी होता. असिफ सय्यदला मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास ४३ वेळा अटक केली आहे. जाफर विरोधातही मुंबईत १० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलीस जाफर याचे अजून काही साथीदार बगदादी, शेरू जाफरी, अब्बास, हसन, बिलाल जाफरी, सरताज यांचा शोध घेत आहेत. यातील काही आरोपींवर मुंबई आणि ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात १०० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!