पवईकर विद्यार्थिनींची जागतिक कराटे स्पर्धेत सुवर्ण किक

स्पर्धा जिंकल्यानंतर राष्ट्रध्वजासोबत किमीक्षा सिं

पवईतील एस एम शेट्टी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय किमीक्षा सिंग या विद्यार्थिनीने आबूधाबी येथील अल-जजिरा क्लब इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या “विनर कप २०१८ जागतिक कराटे स्पर्धेत” दोन सुवर्ण पदके मिळवत, भारतासोबतच पवईकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. काता आणि कुमिते अशा दोन कलांमध्ये तिने ही सुवर्ण पदके मिळवली. भारतासह ६ देश या स्पर्धेत सहभागी झाले होते ज्यात किमीक्षा भारताचे नेतृत्व करत होती.

किमीक्षाने आपल्या गटात श्रीलंका, नेपाळ, फिलिपिन्स, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या देशाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत दोन्ही विजय मिळविले. ती पवई, हिरानंदानी येथील एस एम शेट्टी स्कुल आणि जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून, इयत्ता आठवीमध्ये शिकते. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्शल आर्टकडे लहानपणापासूनच वळलेल्या किमीक्षाने काता आणि कुमिते सारख्या मार्शल आर्ट प्रकारात स्वत:च्या कामगिरीचा अल्पावधीतच ठसा उमटविला आहे. गुरु ओमकार शिवणकर यांच्याकडून ती प्रशिक्षण घेत आहे.

किमीक्षा सिंग प्रशिक्षक ओमकार शिवणकर यांच्या सोबत

सिनियर गटात ब्लु बेल्टची मानकरी असलेल्या किमीक्षाने याआधी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. आवर्तन पवईशी बोलताना ती म्हणाली, ‘भारताच्या तुलनेत अबुधाबीचे तापमान अतिशय वेगळे होते. अशा वातावरणाशी आम्ही एकरुप झालो. इतर देशांच्या खेळाडूंमध्ये सुद्धा किक चपळता चांगली होती. त्यांच्या खेळाचे सूक्ष्म निरीक्षण करीत विजयासाठी मी काही डावपेच आखले. नेमके कसे खेळायचे यासाठी कोचशी चर्चा केली. या सर्व गोष्टींचा मला माझ्या यशात लाभ झाला.’

मुलींनी मार्शल आर्टसारख्या खेळात करियर करावे आणि समाजात खंबीरपणे वाटचाल करावी, असा संदेश देण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही किमीक्षाने यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes