पार्टी करण्यासाठी चोरले कचऱ्याचे डबे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रातिनिधिक छायाचित्र

पार्टी साजरी करण्यासाठी एका सफाई कर्मचाऱ्याने चक्क इमारतीमधील कचऱ्याचे डब्बे चोरल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण पवार (३२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी पवई येथील सी. ई. टी. टी. एम. एम वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहासाठी महाराष्ट्र नेशनल ऑल युनिवर्सिटीने २४० लिटरचे कचऱ्याचे डब्बे दिले आहेत. हे कचऱ्याचे डब्बे कॅम्पस भागात ठेवण्यात आले होते. या वसतिगृहातील सुरक्षारक्षक परिसरात गस्त घालत असताना त्यांना वसतिगृहाच्या आवारात ठेवलेले कचऱ्याचे डब्बे नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

वसतिगृहात सर्वत्र शोध घेवून देखील डब्बे कुठेच मिळून आले नसल्याने अधीक्षकांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

“या वसतिगृहात मुले, मुली राहत आहेत. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच काही मुलांकडे, सुरक्षारक्षकांकडे याबाबत चौकशी सुरु केली होती. मात्र काहीच पुरावे समोर येत नव्हते,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्याचा पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करत असताना गुन्ह्याशी संबंधित एक व्यक्ती चांदिवली, संघर्षनगर येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगांने पाळत ठेवून संशयिताला चौकशीसाठी ताब्यात गेण्यात आले.

“चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, चोरी केलेले कचऱ्याचे ४ डब्बे हे आपल्या मालाड येथील राहत्या घरात ठेवल्याचे सांगितले. आम्ही त्याच्या घरातून चोरी केलेले कचऱ्याचे डब्बे हस्तगत केले आहेत,’ असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.

सपोनी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार बाबू येडगे, पोलीस नाईक आदित्य झेंडे, पोलीस नाईक अभिजित जाधव, पोलीस शिपाई संदीप सुरवाडे आणि संदीप राठोड यांची गुन्ह्याचा तपास केला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!