तुंगागाव, मुरंजनवाडी कंटेन्मेंट झोन; संचारास निर्बंध

कंटेन्मेंट झोनसाकीविहार रोडवरील तुंगागाव आणि मुरंजनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असल्याने वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत  हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णात झपाट्याने वाढ होत असतानाच पवईत आतापर्यंत ३४० बाधितांची नोंद झाली आहे. वाढत्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधित मिळण्याच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक भाग हे सील करत कंटेन्मेंट झोन घोषित केल्याने त्या भागात पुन्हा बाधित मिळण्यास किंवा इतर भागात विषाणू पसरण्यास आळा बसला होता.

मात्र, हळूहळू यात शिथिलता आल्याने पुन्हा बाधित मिळू लागल्याने पालिकेने पुन्हा कंबर कसत ज्या भागात सर्वाधिक रुग्ण मिळत असतील अशा परिसरांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत सील करायला सुरुवात केली आहे. पालिका एल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवईतील तुंगागाव आणि मुरंजनवाडी दोन्ही परिसरांना परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणारे पोलीस प्रशासनाला पत्र

पालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहीनिशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे यांना पाठवलेल्या पत्रानुसार, सहाय्यक आयुक्त एल कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक १५६ मधील मुरंजनवाडी आणि तुंगागाव वस्तीमधील विविध चाळींमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे सदर चाळींचा परिसर प्रवेश निर्गमनासाठी सोमवार दि. ०८.०६.२०२० रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून पुढील १४ दिवस म्हणजे रविवार दि. २१.०६.२०२० रोजी रात्रौ १२.०० वाजेपर्यंत प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. (सोबत जाहीर सूचनेची प्रत) तथापि, प्रतिबंधित क्षेत्र असून देखील सदर परिसरात स्थानिक रहिवाशी यांचा वावर असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

यास्तव प्रभाग क्रमांक १५६ मधील मुरंजनवाडी आणि तुंगागाव परिसरामध्ये कोरोनचा प्रसार रोखण्याकरिता सदर परिसर लॉकडाऊन करण्याचे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. तरी सदरचा परिसर हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याकरिता पोलीस बंदोबस्त करणे आवश्यक आहे. ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या बाहेर ये-जा करण्यावर निर्बंध येतील आणि कोरोनाचा प्रसार थांबविण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करणे शक्य होईल. असे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा: संघर्षनगर, चांदिवली कंटेन्मेंट झोन; व्यवहार आणि संचारास निर्बंध

या काळात सर्व व्यवहार व संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. वरील नमूद परिसरात आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर ‘भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार’ कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे याबाबत पुष्टी करत बोलताना पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेतर्फे परिसराचे सर्व मुख्य प्रवेश सील केला जाणार असून, परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याच्या सूचना फलक सुद्धा तिथे लावले जाणार आहेत. या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून, पूर्व परवानगी शिवाय परिसरातून बाहेर जाण्यास प्रतिबंधित केले जाणार आहे (वैद्यकीय अत्यावश्यकता वगळता), असेही याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!