बसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या दुकलीला पवईमध्ये अटक; २१ मोबाईल हस्तगत

बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या आणि बस स्टॉपवर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा फायदा घेवून मोबाईल, पाकीट चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना पवई पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. झिशान नझीर खान (वय २३ वर्षे), राहणार मुंब्रा कौसा, आणि बाबु किसन चव्हाण (वय ३९ वर्षे), राहणार कळवा, ठाणे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून अंदाजे ५.७५ लाख किमतीचे २१ मोबाईल हस्तगत करत गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही रिक्षा देखील ताब्यात घेतल्या आहेत.

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटना पवई परिसरात घडत असल्याच्या तक्रारी वारंवार पवई पोलिसांच्या समोर येत असल्याने याला रोखण्यासोबतच या चोरांच्या टोळीला पकडण्याचे आव्हान पवई पोलिसांसमोर होते. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाला ही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.

तपास सुरु असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला बेस्ट बसमध्ये आणि बस स्टॉपवर मोबाईल चोरी करणारी टोळी ऑटो रिक्षाने आयआयटी मार्केट गेट जवळील बेस्ट बस स्टॉप परिसरात येणार असल्याबाबाबत खात्रीलायक माहीती गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त झाली होती.

या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस हवालदार दामू मोहोळ, पोलीस हवालदार सावंत, पोलीस शिपाई देशमुख यांनी साध्या वेशात आयआयटी मार्केट गेट परिसरात पाळत ठेवली होती. याचवेळी दोन ऑटो रिक्षा क्रमांक एमएच ०४ एचजे ०११६ आणि एमएच ०४ जेक्यू २८७४ मधून काही इसम तेथे येत संशायास्पद रित्या वावरताना पथकाला आढळले.

“मोबाईल चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आम्ही दोघांना ताब्यात घेवून रिक्षाची झडती घेतली असता रिक्षातून आम्हाला अंदाजे ५,७५,००० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे चोरीचे २१ मोबाईल मिळून आले आहेत,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

“अटक दोन्ही इसम सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी प्रत्येकी ४ गुन्हे दाखल आहेत”, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.

मोडस ऑप्रेंडी

टोळीचे सदस्य ठाणे येथील मुंब्रा आणि कळवा स्थानकाजवळ एकत्रित येवून ताब्यात घेण्यात आलेल्या रिक्षातून विविध परिसरात येत असतात. बस येताच गर्दीच्या वेळी प्रवासी बसमध्ये चढत असतानाच टोळीचे सदस्य रिक्षातून उतरून गर्दीत बसमध्ये चढण्याच्या बहाण्याने धक्काबुक्की करत प्रवाशांचे मोबाईल काढून घेत आणि पुन्हा रिक्षात येऊन बसत. यानंतर ते चोरीचे मोबाईल रिक्षात लपवून ठेवून पुढच्या चोरीसाठी तयार होत.

कधी कधी हे टोळीचे सदस्य बसमधील गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढून प्रवाशांचे मोबाईल चोरी करून पुढच्या बस थांब्याला किंवा सिग्नलवर बस उभी राहताच बसमधून उतरून बसच्या पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या या रिक्षात बसून निघून जातात.

“अटक दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत. या टोळीचे अजून काही सदस्य पळून जाण्यात यशस्वी झाले असून, त्यांचा शोध सुरु आहे.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!