बनावट सोशल मिडिया जाहिरातीच्या आमिषात बेरोजगार व्यक्तीने गमावले २.८ लाख रुपये

कोविड-१९ साथीच्या आजाराच्या काळात बेरोजगार झालेल्या आणि ऑनलाइन नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका पवईकराने नुकतेच ऑनलाईन फसवणुकीत २.८ लाख रुपये गमावले. ४० वर्षीय पदवीधराच्या तकारारदाराने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या तरतुदीनुसार फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार ऑटोमेशन कंपनीत माजी वरिष्ठ व्यवस्थापक होता. नोकरीसाठी ऑनलाईन शोध करत असताना, घरून काम करून जलद आणि उच्च उत्पन्नाचे आश्वासन देणारी एक जाहिरात २५ नोव्हेंबर रोजी सोशल मिडियावर पाहण्यात आली. जाहिरातीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन खरेदी-विक्री करून त्याच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळण्याचे सांगण्यात आले होते.

पुढील दोन दिवस तक्रारदाराने आपल्या बचतीमधील जवळपास २.८ लाख रुपये या कामात गुंतवले. मात्र दोन दिवसाने तक्रारदार ज्याच्या संपर्कात होते त्याने आपला फोन बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. “आरोपीचा माग काढण्यासाठी आम्ही इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आयडी आणि बँकेकडून ज्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत त्याबद्दल माहिती मागवली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “फसवणूक करणार्‍याने व्हॉट्सअ‍ॅपवर वॉलेट खाते उघडण्यासह तसेच वेबपेजवर नोंदणीकृत करण्यासाठी लॉगिन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक लिंक पाठवली होती. त्यानंतर स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास सांगण्यात आले, जी वेबपेजवर विक्रेता म्हणून त्याच्या नावाखाली प्रदर्शित केली जाणार होती. विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या बदल्यात उच्च कमिशन मिळेल असे सांगण्यात आले होते. २४ तासांच्या आत, तक्रारदार यांच्या आयडीवर २.७८ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ७ लाख रुपये कमावल्याचे दाखवले होते. मात्र, जेव्हा त्यांनी त्याच्या बँक खात्यात ते पैसे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते करू शकले नाही.”

बनावट ऑनलाइन जाहिरातींनी आमिष दाखववून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून  पवई पोलिस अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!