विहार तलाव होणार सुरक्षित

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाला सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला असून, बंधाऱ्याची दुरुस्ती, संरक्षक भिंत, लोकांना तलाव भागात प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना, किनाऱ्यावर पर्यटकांसाठी छोटे बगीचे आणि कठडे अशी सुरक्षा आता विहार तलावाला मिळणार आहे. यामुळे तलावात होणाऱ्या दुर्घटना, उपद्रव रोखण्यात यश मिळणार आहे. सोबतच तलावाचे सौन्दर्यकरण सुद्धा होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्तोत्रांपैकी एक विहार तलाव आहे. ४२ दशलक्ष लिटर पाणीसाठवणुकीची क्षमता असणाऱ्या विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष पाणीपुरवठा मुंबईला केला जातो. यामुळे तलावाला निर्माण होणारा धोका हा मुंबईकरांसाठी मोठे पाणीसंकट निर्माण करू शकणार आहे, जे पाहता आता पालिकेने याच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित केले आहे.

ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावाच्या फ्लोटरचे काँक्रीट उखडल्याचा प्रकार समोर आला होता. विहार तलाव ओसंडून वाहू लागताच फ्लोटरच्या काँक्रीटने आपला दम तोडला होता. स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे यांनी याबाबत पालिकेला पत्रव्यवहार करत तलावाची पुन्हा स्ट्रक्चरल पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन पालिका अधिकाऱ्यांनी तलावाच्या सुरक्षिततेची पाहणी करून याच्या सुरक्षिततेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

तलावाच्या भागात साईबंगोडा, उलटणपाडा, खांबाचा पाडा असे अनेक आदिवासी पाडेसुद्धा आहेत. “या पाड्यात राहणाऱ्या रहिवाशांना फक्त तलाव भागातून प्रवेश असतो मात्र मुंबईकर, पर्यटक या भागात पार्टी साजरी करण्यासाठी येत असल्याने परिसराची दुर्दशा झाली आहे. परिसरात कचरा, बाटल्या यांचे साम्राज्य पसरत आहे. तलावात बुडून अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. येथे येणारे काही पर्यटक धिंगाणा घालताना सुद्धा आढळून आले आहेत. तलावाला या सर्वांचा खूप मोठा धोका आहे, असे याबाबत बोलताना स्थानिक प्रतिनिधींनी सांगितले.

या सर्व गोष्टींना पाहता विहार तलाव परिसराला सुरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी जवळपास २६ कोटींचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव आगामी महानगरपालिका महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!