तिनचाकीचे सारथ्य ‘ती’च्या हाती, संसाराचा गाडा हाकण्यासाठी

वई, चांदिवली भागात तुम्ही रिक्षाला हात दाखवता, रिक्षा जवळ येवून थांबते आणि पाहता तर काय एक महिला रिक्षाचालक तिचे सारथ्य करत आहे. हो हे पवईच्या रस्त्यांवर शक्य आहे! कारण गेली अनेक वर्ष केवळ पुरुषांची मक्तेगिरी आहे असे समजले जाणाऱ्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात महिलाही उतरल्या आहेत. पार्कसाईट येथे राहणाऱ्या निशा अमोल दांगट (निशा शिवाजी शिंदे) गेली आठ वर्षे पती, पत्नी आणि मुलगी असा तिघांच्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिनचाकी म्हणजेच रिक्षा चालवत आहेत. पवई, चांदिवलीच्या रस्त्यांवर दररोज सकाळच्या वेळी आरटीओने सन्मान म्हणून दिलेल्या एम एच ०३ सिजी १००० नंबरची रिक्षा चालवताना त्या हमखास नजरेस पडतील.

घरात असणारी महिला ही त्या घररुपी गाडीचे स्टेअरिंग असते. तिच्या आधारावरच संपूर्ण आयुष्याच्या वाटेवर गाडी सुरळीत धावत असते. आपली ही गाडी सुरळीत चालत रहावी म्हणून घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची बारीकसारीक गोष्टीची काळजी घेत घरात राहून सर्व सांभाळणारी ही रणरागिणी वेळप्रसंगी घरातून बाहेर पडून सारथ्य सुद्धा सांभाळते. निशा दांगट या सुद्धा अशाच एक.

निशा यांनी आपल्याच परिसरात एक मोबाईल शॉप सुरु केले होते. मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून आणि पतीकडून मिळणाऱ्या पैशातून घर चालवणे अवघड जात होते. घर संसार चालवण्यासाठी व्यवस्थित पैसा मिळू शकेल असे काहीतरी करण्याची गरज त्यांना भासू लागली होती. मात्र दहावी शिक्षणाच्या आधारावर काय नोकरी मिळणार? म्हणून त्यांचे मावस भाऊ दिलीप कर्नीकर यांना त्यांनी रिक्षा चालवायला शिकवण्याची विनंती केली. ‘मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा चालवणे अवघड आहे, तू काहीतरी वेगळे कर’ असे त्यांनी सांगितले. मात्र निशा यांनी हट्ट केल्याने अखेर त्यांनी रिक्षा चालवणे शिकवलेच शिवाय परवाना मिळवून देण्यात सुद्धा मदत केली.

सुरुवातीला पार्कसाईट, विक्रोळी, घाटकोपर, पवई अशा घरापासून जवळ छोट्या छोट्या अंतरासाठी त्यांनी प्रवासी वाहतूक करायला सुरुवात केली. आता त्या रिक्षाचालक म्हणून काम करत आहेत त्याला आठ वर्ष झाली असून, सायन ते कल्याण आणि विरार ते सांताक्रूझ संपूर्ण मुंबईत त्या सकाळी ७ ते संध्याकाळी ५.३० या काळात मिळेल ते (स्त्री, पुरुष) आणि मिळेल त्या ठिकाणी भाडे घेवून जातात.

त्या सांगतात, “या व्यवसायात आल्यावर सुरुवातीला पुरुषांची मक्तेदारी असल्याने आणि प्रत्येक ठिकाणी थांबा पद्दत असल्याने सहकारी रिक्षा चालकांचा त्रास जाणवला. मात्र त्यावेळी ग्राहकांनी चांगली साथ दिली. आता पुरुष रिक्षाचालक मंडळीनी सुद्धा आम्हाला स्वीकारले आहे. शिवाय रिक्षा चालवताना घालायच्या कपड्यांमध्ये आरटीओने शिथिलता दिल्याने आता महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात या व्यवसायात येण्यास हरकत नाही.”

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संध्याकाळनंतर सुद्धा त्यांना रिक्षा चालवण्याची इच्छा आहे. मात्र आपल्या ३ वर्षाच्या मुलीला मैत्रिणीकडे दिवसभर सोडणाऱ्या “आईला” ते शक्य होत नाही. मुलगी मोठी झाल्यावर महिलांसाठी संध्याकाळचा काही विशेष वेळ देण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!