पवईत तरुणांकडून गरजू गरीबांना जेवणाची सोय

आपल्या परिसरातील एकालाही उपासमारीमुळे मरू द्यायचे नाही हा उद्देश समोर ठेवत तरुण जपत आहेत सामाजिक बांधिलकी. गरजू गरीबांना केली जेवणाची सोय.

पवईत तरुणांकडून गरजू गरीबांना जेवणाची सोय

संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत असताना गरीब आणि बेघर लोकांच्या पोटाची भूक मिटवण्यासाठी पवईतील तरुणांनी पुढाकार घेत, आज, २६ मार्चला विविध भागात उड्डाणपुलांखाली आसरा घेतलेल्या गरीब गरजू लोकांना अन्नदान केले. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि आपल्या विभागाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या पोलीस यंत्रणेला सुद्धा त्यांनी जेवणाची सोय केली. एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळात हे तरुण अशाच प्रकारे सेवा देणार आहेत.

कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचे आदेश काढलेले असतानाच २५ मार्चला केंद्राकडून संपूर्ण देशाला लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांनंतर हातावर पोट असलेल्या अनेक लोकांना आणि निराधार असणाऱ्या अनेकांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे पाहता पवईतील फुलेनगर भागात राहणाऱ्या तरुणांनी पुढाकार घेत गरजू गरीबांना जेवणाची सोय केली आहे.

पवईत तरुणांकडून गरजू गरीबांना जेवणाची सोय

पवईतील युवा भिम गर्जना मित्र मंडळाच्या युवकांनी येणाऱ्या काळात जे लोक रस्त्यावर आहेत, जे निराधार आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारची खायची सुविधा नाही, तसेच एवढे मोठे संकट उभे ठाकले असताना निधड्या छातीने लोकांच्या सुरक्षेसह आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी किमान एकवेळ जेवणाची सोय करण्याचा चंग बांधला आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक कार्यालये बंद करण्यात आली आहेत किंवा वर्क फ्रॉम होम तत्वावर चालू असतानाच पवईतील रामा कोंकण, रवींद्र वाहुळे, अजय शिंदे, प्रवीण आंभोरे, सुभाष आव्हाड, लंकेश गाडेकर, विनोद भदरगे, विनोद पाखरे, विकास वाहुळे, नितीन शेट्टी, आकाश पाखरे, हनुमंता कोळी, अजय वाहुळे, मनोज पाखरे या तरुणांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेत हा उपक्रम हाती घेतला आहे.

“नोकरी – धंदा करणारे या काळात आपली दोन वेळच्या जेवणाची कशीबशी सोय नक्की करू शकतील, मात्र ज्या लोकांचे पोट हातावर असते त्यांना दररोज आपल्या पोटासाठी बाहेर पडणे आवश्यक असते. सध्याच्या काळात ते शक्य नसल्याने त्यांना उपाशी राहण्याची पाळी येवू नये म्हणून आम्ही तरुणांनी त्यांना किमान एकवेळच्या जेवणाची सोय करण्याचा हा निर्णय घेतला आहे. आमचा एवढाच उद्देश आहे आपल्या परिसरातील एकालाही उपासमारीमुळे मरू द्यायचे नाही” असे यावेळी बोलताना या तरुणांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes