पवईचे स्वच्छता दूत: तरूणांनी हातात झाडू घेत केली शौचालयाची स्वच्छता; बसवले सीसीटिव्ही

 

@रविराज शिंदे

पवईतील महात्मा फूले नगरातील शौचालयाची दयनीय अवस्था झाल्याचे पालिका ‘एस’ विभागाला वेळोवेळी कळवूनसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत या शौचालयाची स्वच्छता केली. यामुळे त्रस्त रहिवाशांना दिलासा मिळाला असून, टाळाटाळ करणाऱ्या पालिकेला आणि जनप्रतिनिधींना सणसणीत चपराक मारली आहे.

पवईतील आयआयटी भागाला लागून असणारा फूलेनगर परिसर हा असंख्य झोपड्या दाटीवाटीने वसलेला भाग आहे. मात्र, या परिसरात मोजकीच शौचालये नागरिकांसाठी बनवण्यात आली आहेत. या शौचालयांची दुरावस्था झाली असून, दरवाजे तुटलेल्या अवस्थेतील आहेत. तुटलेल्या लाद्या, मलनिस्सारण पाणी रस्त्यावर आल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी अशी या शौचालयांची अवस्था झाली आहे. या समस्यांमुळे फूलेनगरकर त्रस्त झालेले असतानाच वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिका आणि लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत होते.

परिसरात या समस्येसोबतच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील तरूण पीढी अखेर पुढे सरसावली. येथील युवा भिम गर्जना मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पगारातील एक हिस्सा ही समस्या सोडविण्यासाठी लावला. हातात झाडू घेत संपूर्ण शौचालय चकचकीत करतानाच येथील शौचालयाचे तुटलेले दरवाजे, लाद्या दुरुस्त करत विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. पालिकेला जबरदस्त चपराक देत एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

“आमच्या परिसरात शौचालयाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रचंड दुर्गंधी, तुटलेले दरवाजे सारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. त्यामुळे आम्ही तरूणांनी पुढाकार घेत पगारातील छोटासा हिस्सा देत याची स्वच्छता करत, परिसरात दिवे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीची सुविधा केली आहे.” – रामा कोंकल

तरूण एवढ्यावरच थांबले नाहीत, तर परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्या, गाड्यांची तोडफोड यावर वचक बसावे म्हणून स्वखर्चाने परिसरात सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. रामा कोंकण, रवींद्र वाहुळे, प्रवीण आंबोरे, सुभाष आव्हाड, नितीन शेट्टी, विनोद पाखरे, आकाश पाखरे या तरूणांच्या आदर्श कर्तृत्वाचे फूलेनगर वासियांकडून कौतूक होत आहे.

, , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: