पालिकेच्या वेळकाढू धोरणाने त्रस्त पवईकरांनी दगडे रचून बनविला येण्या-जाण्याचा रस्ता

नागरिक मिठी नदी पात्रात दगड टाकून येण्या-जाण्याचा रस्ता बनवत असताना

@अविनाश हजारे @रमेश कांबळे

पवईच्या जयभिमनगर, गौतमनगर येथे मिठी नदीवर नागरिकांच्या रहदारीसाठी असलेला पादचारी पूल पालिकेने दुरुस्तीसाठी काही आठवड्यांपूर्वी तोडला आहे. अनेक आठवडे उलटून सुद्धा ब्रिजचे काम सुरु होत नसून, पालिकेला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काहीच पाऊले उचलली जात नाहीत. या सर्व खटाटोपानी कंटाळलेल्या या परिसरातील त्रस्त नागरिकांनी अखेर स्वतः पुढाकार घेऊन रविवारी अक्षरशः दगडे रचून आपल्या येण्या-जाण्यासाठी रस्ता बनवत पालिकेच्या वेळकाढू धोरणावर सणसणीत चपराक लगावली आहे.

पवईतील निटी परिसरातून जाणाऱ्या मिठी नदीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या जयभिमनगर, गौतमनगर परिसरात जाण्यासाठी २००१ सालच्या आसपास मिठी नदीवर एक पादचारी पूल बनवण्यात आला होता. ज्यानंतर ३१ डिसेंबर २०१४ साली पालिकेने या भागात असणाऱ्या मोरारजीनगर आणि जयभिमनगर परिसरात पुन्हा नव्याने पूल उभारणीची वर्क ऑर्डर काढली होती.

‘२०१५ला पालिकेने या वर्क ऑर्डरनुसार मोरारजीनगर येथे पुलाचे काम तर केले मात्र जयभिमनगर येथील पूल बनवलाच गेला नाही. याबाबत मी पालिकेकडे सतत पाठपुरावा करत होतो, मात्र त्यांच्याकडून फक्त टोलवाटोलवीची उत्तरे मिळत होती. पालिका ब्रिज खात्याच्या चीफ इंजिनिअरकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी पालिका ‘एस विभाग’ सहयोग देत नसल्याचे सांगितले’ असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक आणि सामजिक कार्यकर्ते पवन पाल यांनी सांगितले.

तोडण्यात आलेल्या पुलाचा भाग

ते पुढे म्हणाले, ‘पालिका प्रत्येक पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या डागडुजीचे काम करत असते. सततच्या पाठपुराव्याअंती त्यांनी ऑक्टोबर २०१७’ला येथे नवीन पुलाच्या निर्मितीचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले मात्र काम सुरु झालेच नाही. अखेर १४ मे २०१९’ला हा पूल पाडण्यात आला असून, तिथे कोणतेही काम केले जात नाही आहे. एका आठवड्यात काम सुरु करू असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते मात्र १५ दिवस उलटून गेले तरी अजून काम सुरु करण्यात आले नाही. काम कधी सुरु करणार याबाबत सुद्धा पालिकेकडून काहीच उत्तर दिले जात नाही.’

नागरिकांनी श्रमदानातून बनवलेला रस्ता

‘या परिसरात ४५० पेक्षा जास्त घरे असून, जवळपास ३००० नागरिक दररोज या भागात येत-जात असतात. मात्र पूल पडल्यापासून १.५ किलोमीटर परिसर फिरून नागरिकांना जावे लागत आहे. या दीड किलोमीटरचा प्रवास नागरिकांना गल्ली बोळासह मिठी नदीच्या किनाऱ्यावर बनवलेल्या सुरक्षा भिंतीवरून जीव मुठीत घेवून करावा लागतो आहे. जरा जरी तोल गेला तरी मिठी नदीत पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा आहे’ असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

‘आम्ही पालिका अधिकाऱ्यांना पूल कधी बनवणार याची विचारणा केली असता त्यांनी निवडणूक, आचारसंहिता सह विविध कारणे देत या विषयावर टाळाटाळ केली आहे’ असेही याबाबत आवर्तन पवईशी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या वस्तीत जाण्यासाठी हा एकमेव पूल होता, मात्र तो पूलच पडला गेल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ४ हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीतील लोकांची रहदारी ठप्प झाली आहे. अनेकदा पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने अखेर येथील त्रस्त नागरिकांनी एकत्रित येत स्वतःच पुढाकार घेऊन मिठी नदीच्या पात्रात दगडे रचून आपला तात्पुरता रस्ता तयार केला आहे’ असे याबाबत बोलताना पाल यांनी सांगितले.

सध्यातरी येण्या-जाण्यासाठी हा रस्ता वापरणे सोयीचे झाले असले तरी, पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि विहार तलाव ओसंडून वाहू लागल्याने येणारे पाणी यामुळे नदी पात्रात पाणी वाढल्यानंतर लोकांना या रस्त्यावरून येणे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे ‘पालिकेने लवकरात लवकर यावर योग्य ती उपाययोजना केली नाही तर, लवकरच आम्ही कठोर पाऊले उचलत रस्त्यावर उतरून आंदोलन करू’ असेही याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!