पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

पवईकर आणि सामाजिक कार्यकर्त्या पामेला चीमा (समन्वयक (अग्नी) एस विभाग) यांच्या नेतृत्वात, पवईकरांच्यावतीने प्रतिनिधित्व करत पवईकर आणि सामाजिक कार्यकर्ते एस के सक्सेना, सीए जे शहा, गीतांजली धुळेकर, संजना ठक्कर आणि कमल चिमा यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.

याबाबत बोलताना चिमा म्हणाल्या की “पवईकरांमध्ये झालेल्या संवादामध्ये बऱ्याच लोकांनी हा पवई तलावातून जाणारा सायकल ट्रॅक तलावासाठी विनाशकारी आहे अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना ही योजना रद्द करण्याची विनंती केली आहे.”

कोणालाही सायकल ट्रॅक नको आहे. सायकल ट्रॅक बनत असलेल्या मार्गात मगरींची स्थळे आहेत. त्या येथील काठावर अंडी देतात. तुळशी, विहार आणि पवई हे तीन तलाव हे पर्यावरणीय व्यवस्थेचा एक भाग आहेत. प्रत्येक तलाव एक-दुसऱ्यामध्ये ओसंडून वाहतो. तर, पवई तलावच्या ओव्हरफ्लोचे पाणी मिठी नदीत जाते; त्यामुळे सायकल ट्रॅकसाठी तलावाचा आकार आणखी कमी केल्याने शहरात पूर येईल. असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

संबंधित नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले की, “सायकल ट्रॅकसाठी कोणतेही पर्यावरण प्रभाव मूल्यांकन केले गेलेले नाही. तसेच स्थानिक आणि भागधारकांची मते आणि आक्षेप विचारात घेतले गेले नाहीत. अशात निसर्गाला हानी पोहचवत प्रकल्प पुढे रेटत नेणे किती योग्य आहे?”

पत्रात असेही लिहिले आहे की, “महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी, हे भयावह आहे की मुंबई महानगरपालिका म्हणते की पवई तलाव ही वेटलँड जमीन नाही कारण ती मानवनिर्मित आहे. डेव्हलपमेंट २०३४ मध्ये सुद्धा सायकल ट्रॅकचा कोठेही उल्लेख नाही. असे सर्व असतानाही अशा प्रकल्पाची कल्पना कशी केली गेली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

वादग्रस्त सायकल ट्रॅक प्रकल्पाजवळच्या भागात काही हिरवी – निरोगी झाडे तोडल्याचे आढळून आले आहे. तर काही भागात झाडांवर नंबर सुद्धा टाकण्यात आले आहेत. ही झाडे कुणी तोडली आणि कशासाठी याच्यासोबत नंबर टाकलेल्या झाडांचे करणार काय? असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.

पाठीमागील काही दिवसांपासून, म्युज फाउंडेशनच्या नेतृत्वात अनेक तरुण, विद्यार्थी आणि कार्यकर्ते पालिका आणि राज्य सरकारला सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द करण्याची विनंती करून तलावाजवळ निदर्शने करत आहेत. वनशक्ती एनजीओचे पर्यावरणवादी डी स्टालिन यांनी एनजीटीमध्ये पवई तलावातील सायकल ट्रॅकविरोधात याचिका सुद्धा केली आहे.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!