पवईकराने उचलला ग्रामीण भागातील ५०० कुटुंबाच्या रेशनचा खर्च

आपली गावे, खेडी सोडून अनेक कुटुंबाना पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. मात्र इथे आल्यावर आपल्या गावाला विसरून चालत नाही. कोरोनामुळे अशी अनेक गावे आणि तेथील कुटुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. अशाच एका गावचे सुपुत्र पवईकर सुधाकर बाबर यांनी ही परिस्थिती लक्षात घेत गावातील सर्व रेशनधारकांचा खर्च स्वतः उचलत त्यांना आधार दिला आहे. याबद्दल येथील तहसीलदार यांनी बाबर यांचे आभार व्यक्त करतानाच तालुक्यातील इतर सक्षम लोकांनी बाबर यांच्याप्रमाणेच आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

तहसीलदार सचिन पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रोहन मोदी आणि बाबर यांच्या मातोश्री कालाबाई बाबर यांच्या हस्ते गावातील ५०० कुटुंबातील २३०० लोकांना हे धान्यवाटप करण्यात आले.

देशभर सोहम हॉलिडेच्या नावाने पर्यटन क्षेत्रात आपले नाव निर्माण करणारे आणि पवईकर सुधाकर बाबर हे मूळचे सांगली जिल्यातील आवंढी गावचे. कामानिमित्त शहराकडे आलेल्या अनेक कुटुंबापैकी एक त्यांचे कुटुंब. मुंबईच्या भांडूप आणि नंतर पवई भागात ते स्थायिक झाले. कुटुंबातील प्रत्येकाने आपआपले व्यवसाय उभे करत कुटुंबाला भक्कम करण्यात आपले योगदान दिले आहे. आपला उद्योग व्यवसाय उभा करत असताना आपली समाजिक बांधिलकी त्यांनी कायम जपली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना लक्षात ठेवून बाबर पवई आणि आसपासच्या परिसरातील गरीब गरजू लोकांना नेहमीच मदत करत आले आहेत.

गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणात तर त्यांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. अनेक मुलांना शैक्षणिक सहकार्य करण्यासोबतच त्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी सुद्धा ते नेहमीच विशेष प्रयत्नशील असतात.

५०० कुटुंबांच्या रेशनचा खर्च

कोरोना महामारीचे संकट आले आणि यामुळे अनेक उद्योगधंदे यांची आर्थिक घडी विस्कटली. या महामारीचा परिणाम केवळ शहरातच नव्हे तर गावखेड्यांमध्ये, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या काळात रोजगारासह, शेतीत सुद्धा उत्पन्नाचे प्रमाण कमी झाल्याने गावातील लोक आर्थिक अडचणीत आली आहेत. हिच परिस्थिती लक्षात घेवून बाबर यांनी आपल्या गावातील ५०० कुटुंबाना रेशनवर मिळणाऱ्या धान्याचा खर्च स्वतः भरत त्यांना हे मोफत राशन मिळवून दिले आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच बाबर यांनी हा विडा उचललेला आहे. जून महिन्यात जवळपास १५० कुटुंबाना त्यांनी गहू, तांदूळ आणि डाळी असे राशन मोफत दिले होते. ग्रामीण भागात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क, सेनिटायझर आणि ग्लोव्हजचे वाटप सुद्धा केले.

“गावात कोरोनाचे ४ रुग्ण सापडल्याने गाव २८ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये होते. गावातील मजूर, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांच्या हाताला काम नव्हते. मजूर गावाबाहेर जावून काम करू शकत नव्हते. त्यांची उपासमार होऊ नये हा उद्देश समोर ठेवत मी त्यांना सहकार्य करण्याचे ठरवले. गावातील सरपंच आणि इतर गावकरी यांचे यासाठी विशेष योगदान लाभले,” असे याबाबत बोलताना बाबर यांनी सांगितले.

कोरोना काळात काही गावकऱ्यांनी शहरात राहणाऱ्या आपल्या लोकांना नाकारले आहे. तर दुसरीकडे शहरात असणाऱ्या अनेक सक्षम गावकऱ्यांनी आपल्या गावाकडे पाठ फिरवली आहे. अशात बाबर यांचे योगदान खरेच वाखणण्याजोगे आहे. त्यांच्या या कार्याला ‘आवर्तन पवई’ सलाम करते.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!