पवईत आजपर्यंत ९४ कोरोना पॉझिटिव्ह; आयआयटी फुलेनगर हॉटस्पॉट

कोरोना पॉझिटिव्ह

बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि मुंबई पोलीस यांच्याकडे नोंदवण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पवईतील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सोमवार, ११ मे पर्यंत ९४ वर पोहचला आहे. बरेच दिवस चाळसदृश्य लोकवस्तीत मर्यादित राहिलेल्या कोरोना विषाणूमुळे पवईतील इमारत भागात राहणारे रहिवाशी सुद्धा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आयआयटी मार्केटजवळ असणारा फुलेनगर कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट झाला आहे. सोमवार अखेरपर्यंत येथे ३१ बाधितांची नोंद झाली आहे.

शुक्रवारी ८ मे रोजी सकाळी हिरानंदानी गार्डन्स येथील एका इमारतीत राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यापाठोपाठच आयआयटी फुलेनगर येथील एक पुरुष कोरोना बाधित असल्याचे समोर आले. तर, आरे कॉलोनी रोडवर असणाऱ्या चाळसदृश्य मोठ्या लोकवस्तीत एक महिला आणि एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

एकाच दिवसात १४ बाधितांची नोंद

शनिवारी ९ मे रोजी पवईतील बाधितांच्या आकड्याने मोठी उसळी घेतली ती आयआयटी मार्केटजवळ असणाऱ्या फुलेनगर भागातील १४ बाधितांमुळे. या भागात यापूर्वी मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली होती ज्याला पाहता येथे पालिकेतर्फे फिव्हर क्लिनिक आणि गुरुवारी ७ मे रोजी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाब घेण्यात आलेल्या लोकांपैकी १४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या आयआयटी मार्केट येथील फुलेनगरमधील बाधितांमध्ये २५, २७, आणि ४० वर्षीय ३ स्त्रियांचा तर, २३ ते ६७ वर्ष वयोगटातील ११ पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. यातील लक्षणे नसणाऱ्या बाधितांना कर्वेनगर येथील अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह

छाया: मुकेश त्रिवेदी आणि रमेश कांबळे

रविवार, १० मे रोजी चैतन्यनगर येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले. यापाठोपाठच तुंगागाव येथे एका नामांकित कंपनीच्या कामगारांना जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला तसेच येथील एका ४० वर्षीय रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. रहेजा विहार कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका इमारतीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या घरातील ३४ वर्षीय पुरुषाचे ८ मे रोजी स्वाब तपासणीसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच कुटुंबातील ३४ वर्षीय महिलेला ६ मे रोजी ताप आणि डोकेदुखी जाणवत असल्याने ८ मे रोजी तिचेही स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तिचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तसेच याच कुटुंबातील १८ महिन्याच्या मुलीचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह

सोमवार, ११ मे रोजी हिरानंदानी येथील एका इमारतीतील ३८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. महिला उपचारासाठी येथील एका खाजगी रुग्णालयात जात होती. या इमारतीचा भाग सील करण्यात आला आहे. यासोबतच मिलिंदनगर येथील चाळसदृश्य वसाहतीत राहणारी एक ज्येष्ठ महिला सुद्धा कोरोना बाधित असल्याचे समोर येत आहे. दिवसाच्या शेवटी आयआयटी मार्केट फुलेनगर परिसरातील ५८ वर्षीय आणि ४० वर्षीय पुरुषांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ वर्षीय इसमावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोरोना पॉझिटिव्हदोन कोरोना बाधितांचा मृत्यू

शनिवारचा धक्का पचवला नसेल कि रविवार पवईसाठी अजून एक मोठा धक्का देणारा ठरला. या दिवशी कोरोनावर उपचार घेत असलेल्या पवईतील दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. पहिल्या घटनेत पवईतील वरचा तुंगा येथील ७ मे रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत २६ एप्रिल रोजी आयआयटी मार्केट येथील फुलेनगर भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ५७ वर्षीय बाधिताचा राजावाडी रुग्णालय येथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

५७ वर्षीय मृत बाधिताचे नातेवाईक सध्या अलगीकरण कक्षात आहेत. “मी माझ्या वडिलांशी दररोज बोलत होतो. शनिवारी रात्री रुग्णालयातून ते बरे असल्याचे मला सांगण्यात आले. रविवारी सकाळी अचानक रुग्णालयातून फोन आला आणि माझ्या वडीलांचा मृत्यू झाला असल्याचे मला सांगण्यात आले. मी माझ्या वडिलांना शेवटचे बघू द्या अशी विनंती पालिका अधिकाऱ्यांकडे केली, मात्र नियमांचे कारण देत अलगीकरण कक्षातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली” असे याबाबत बोलताना त्यांच्या मुलाने सांगितले.

१५ पेक्षा अधिक कोरोनामुक्त

या सर्वांमध्ये पवईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १५ पेक्षा अधिक लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. मात्र अनेक बाधित हे मोठी लोकवस्ती असलेल्या भागातून येत असल्याने आणि त्यांना लक्षणे नसल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांनाही घरी सोडण्यात येईल.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!