बिल्डर आणि खाजगी ट्रस्टच्या मालकी वादात बळी पडलेल्या रहेजा विहारकरांचे अधिकारासाठी रविवारी निषेध आंदोलन

बिल्डर आणि एका खाजगी ट्रस्टच्या मालकी हक्काच्या वादात रहेजा विहारमधील घर मालकांना आपल्या घराचे कोणतेही कायदेशीर व्यवहार करण्यास आलेल्या बंदीच्या नोटीसी विरोधात रविवार, ३० जूनला येथील स्थानिकांकडून निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रहेजा विहार येथील पालिका इन्स्टिट्यूटच्या जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या मोकळ्या जागेत सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

पवई, चांदिवलीच्या गेल्या दशकात झालेल्या विकासात चांदिवली भागात नहार अम्रित शक्ती, रहेजा विहार, म्हाडा वसाहत, लेक होम, लोकमिलन अशा अनेक कॉम्प्लेक्सची निर्मिती येथे करण्यात आली आहे. यातील एक महत्वाचे म्हणजे ‘के रहेजा गृप’ यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले रहेजा विहार. जवळपास २० सोसायटीत २५०० ते ३००० परिवाराचे आज येथे वास्तव्य आहे. पवई तलाव आणि चांदिवलीचे ऐतिहासिक चांदिवली स्टुडीओ यांच्या मधोमध वसलेल्या या वस्तीला वाहतूक कोंडी, किलबिलाट अशा सर्वांपासून दूर असल्याने शांतीचे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखले जाते.

सुरुवातीच्या काळात बिबट्याच्या वावरामुळे आणि मुलावर झालेल्या हल्ल्यानंतर काही काळ शांतता भंग आणि भीतीत असणाऱ्या या परिसरात काही दिवसातच ही शांती परतली होती. रहेजाकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाच असेल की आता एक नवीन संकट त्यांच्या डोक्यावर तरंगत आहे.

एका खाजगी संस्था आणि विकासक या दोघांच्यात येथील जमिनीच्या मालकी हक्काला घेवून चाललेल्या वादात रहिवाशांना नोटीसी पाठवून येथील कुठलेही व्यवहार करण्यास बंदी आणली आहे.

“विकासकाच्या प्रतिष्ठेला पाहून जवळपास २० रहिवासी सोसायटीतील लोकांनी दशकापूर्वी येथे आपली स्वप्नातील घरे खरेदी केली आहेत. मात्र आता आम्हाला या इमारती उभी असणाऱ्या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरु असून, टायटल क्लीअर नसल्याचे सांगितले जात आहे. प्रॉपर्टी कार्ड तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे असून, त्याने न्यायालयात धाव घेत आमच्याकडे त्याच्या मर्जीची मागणी केली आहे. विकासकाने आमच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन करतानाचा आमचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे” असे याबाबत बोलताना गौतम सैगल यांनी सांगितले.

“जमिनीच्या वादावरून न्यायालयात वाद सुरु असताना सुद्धा विकासक येथील मोकळ्या जमिनीवर नवीन इमारती बनवण्याचे काम जोमात करत आहे. आमची समस्या अजून मिटली नसताना नवीन इमारतीत आणखी लोकांची अडवणूक होवू नये यासाठी रविवारी, ३० जूनला आम्ही हे बांधकाम सुरु असणाऱ्या जागेत एकत्रित येवून विकासक यांना जाब विचारण्यासोबतच पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहोत,” असे शेट्टी यांनी याबाबत बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!