सायबर फसवणुकीत निवृत्त प्राध्यापिकेने गमावले ३ लाख

एका ८५ वर्षीय आयआयटीच्या निवृत्त प्राध्यापिकेचे बँक खाते अनफ्रीझ करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने त्यांची २.९५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्याने प्राध्यापिकेला त्यांचे बँकिंग तपशील शेअर करण्यास सांगत विविध व्यवहारांच्या मालिकेतून ₹३ लाख लांबवले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निवृत्त पेन्शनधारक प्राध्यापिकेला फोन आला होता. समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख एका खाजगी बँकेतील कर्मचारी असल्याची सांगत, ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या बँकेची माहिती देत तुमचे खाते गोठवले असल्याचे सांगितले. खाते अनफ्रीझ करण्याच्या बहाण्याने कॉलरने वृद्धेला त्यांचे बँक तपशील जसे की खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि डेबिट कार्ड क्रमांक सिव्हीव्ही सोबत शेअर करण्यास सांगितले.

सेवानिवृत्त प्राध्यापिकेने या सर्व तपशीलांच्या आवश्यकतेसाठी कॉलरकडे उत्तरे मागितली असता, कॉलरने ही बँकेची प्रक्रिया आहे आणि जर खाते अनफ्रीझ केले नाही तर ते नंतर परत करता येणार नाही असे स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकाचे ते दैनंदिन खर्चासाठी वापराचे खाते असल्यामुळे ती घाबरली आणि फसवणूकीला बळी पडली. त्यांनी कॉलरने मागितलेले सर्व तपशील शेअर केले आणि मोबाइल नंबरवर मिळालेला ओटीपीही दिला.

काही वेळातच ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून व्यवहारांच्या मालिकेत पैसे कापले जात असल्याचे संदेश आले. अशाच प्रकारे खात्यातून आणखी काही व्यवहार करण्यात आले. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सेवानिवृत्त प्राध्यापिकेला समजले की त्यांचा इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड रीसेट करण्यात आला आहे आणि मोबाईल नंबर बँकिंग माहिती अधिकृततेशिवाय बदलण्यात आली आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त प्राध्यापिकेने पवई पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. पवई पोलीस अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!