पॅसेंजर म्हणून प्रवास करून पवईत रिक्षावाल्यांना लुटणारी टोळी गजाआड

पवई, साकीनाका भागात रात्रीच्या वेळी रिक्षात प्रवास करून रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीतील दोघांच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अजून एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रान पिरमोहम्मद शेख (वय २१ वर्षे), शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा (वय २० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा पोलिस शोध घेत आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ००.१० वाजता पासून ०१.३० वाजताच्या दरम्यान फिल्टरपाडा ते हिरानंदानी आणि पिकनिक हॉटेल ते भीमनगर, आरे रोड अशा दोन वेगवेगळ्या परिसरात प्रवास करताना, ऑटोरिक्षामधून प्रवास करणाऱ्या तीन इसमांनी निर्जनस्थळी रिक्षाचालकांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन घेवून पोबारा केल्याची तक्रार पवई पोलिस ठाण्यात प्राप्त झाली होती.

या संदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनोद लाड आणि पथक यांच्याकडे तपास सोपवला होता.

यासंदर्भात पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणाची पहाणी करून आपल्या खबऱ्याना माहिती मिळवण्यास सांगितले होते. “हे काम नशेखोरांचे असण्याची शक्यता असल्याने आम्ही अशा प्रकारच्या तरुणांच्या अड्ड्यांवर सुद्धा नजर ठेवून होतो. यावेळीच पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील काही आरोपीनी मिळून हा गुन्हा केल्याची माहिती आम्हाला मिळाली”, असे याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.

“अभिलेखावरील आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळताच आम्ही सापळा रचून आज (मंगळवार, २७ ऑगस्ट) पहाटे ४.३० वाजता इम्रान पिरमोहम्मद शेख आणि शिवम उर्फ गुड्डू ब्रम्हदेव झा यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, अजून एक साथीदार युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याच्यासह त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे,” असे गुन्हेप्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

आरोपींकडून पोलिसांनी जबरी चोरीतील मोबाईल हस्तगत केले असून, आरोपींना आज (मंगळवार, २७ ऑगस्ट २०१९) न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच गुन्ह्यातील पाहिजे आरोपी युनुस उर्फ शेरू जावेदअली सैयद याचा पोलिस शोध घेत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!