पंचकुटिर पादचारी पुलावर विधी शाखेच्या विद्यार्थ्यासोबत लूटमार

पवई, आयआयटी कॅम्पसमध्ये राहणार २१ वर्षीय विधी शाखेचा विद्यार्थी अनिरुद्ध सावंत याला तीन अज्ञात इसमांनी पंचकुटिर पादचारी पुलावर गाठून, त्याच्या जवळील पैसे व मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री पवई परिसरात घडली. रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. विद्यार्थ्याने याबाबत पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पैसे, फोन देण्यास नकार करताच तीन पैकी दोन जणांनी त्याला पकडले, तर तिसऱ्या साथीदाराने त्याला मारहाण करायला सुरुवात केली असे त्याने पोलीस जवाबात म्हटले आहे. अनिरुद्धचा आवाज ऐकून त्याचे काही मित्र त्याच्या मदतीला धावत येताना पाहून चोरटयांनी तेथून धूम ठोकली.

दुसऱ्या दिवशी गुरुवारी अनिरुद्धने आपले विधी शाखेचे ऍडमिशनचे काम केल्यानंतर मुंबई पोलिसांना ट्विट करून घडला प्रकार सांगितला.

मुंबई पोलिसांना केलेल्या ट्विटमध्ये अनिरुद्ध यांनी सांगितले की, किराणा दुकानात खरेदी करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या कॅम्पसमधील घरी पंचकुटिर पादचारी पुलावरून तो परतत होता. संपूर्ण पुलावर अंधार पसरला होता. अचानक तीन इसम बाहेर आले आणि मला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत मी पवई पोलीस ठाण्यात एनसी (अदखलपात्र गुन्ह्याची नोंद) केली आहे.

Coming home from grocery shopping does sounds nice..but today around 8:30 in the evening i took the Panchkutir skywalk , three men came out of nowhere and started hitting me..tried to rob me
Did file an NC at Powai Police Station@MumbaiPolice@powaiinfo pic.twitter.com/zt0zgyrJ55

— अनिरुद्ध (@MankariSawant) October 31, 2018


तो पुढे म्हणतो, त्यांच्या बोलण्याच्या स्वरातून ते उत्तर भारतीय असावेत असे आढळून येते. मी पवई पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलो तेव्हा अजून धक्कादायक घटना माहिती पडली कि, एका वृद्धाला हिरानंदानी बस स्टॉपजवळ असणाऱ्या उड्डाणपुवर ८.४५ वाजता लुटण्याचा प्रयत्न झाला होता. वृद्धाने विरोध करताच त्याला बांबूने मारहाण करण्यात आली.

एका अन्य ट्विटमध्ये सावंत म्हणतो, गेल्या महिन्यात त्याने ट्विट करून मुंबई पोलिसांना स्कायवॉकवरील दिव्याबद्दल काहीतरी करण्यास सांगितले होते. मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा ट्विट केले की हे प्रकरण बीएमसीकडे पाठविण्यात आले आहे. परंतु काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सोबत त्याने त्याच्या पाठीमागील पोस्टचे स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केले आहेत.

या प्रकरणात सावंत यांच्या तक्रारीवर पोलिसांनी एनसी (अदखलपात्र गुन्ह्याची) नोंद करून टाळाटाळ केल्या प्रकरणी वरिष्ठांनी त्वरित गुन्हा नोंद करून घेण्याचे आदेश दिले असून, शेवटची बातमी हाती आली तेव्हा अनिरुद्धला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!