साकीनाका, तरुणाला मारहाण करून एटीएमबाहेर लुटले

शुक्रवारी साकीनाका येथे दोन अज्ञात इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. तरुण एटीएममधून पैसे काढून निघाल्यानंतर काही मिनिटांत ही घटना साकीनाका येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोमध्ये काम करणारा ऋषिकेश दास साकीनाका येथील एटीएममधून पैसे काढून जात असताना तेथेच उपस्थित असणाऱ्या इसमांनी त्याचा पाठलाग करत त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रक्कम आणि मोबाईल घेऊन पसार झाले.

दास पैसे काढायला एटीएममध्ये गेला तेव्हा दोन्ही इसम तिथेच आत होते. दोघांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दुर्लक्ष केले, असे दास याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

‘दास एटीएममधून पैसे काढल्यानंतर आपल्या घरी जाण्यास निघाला तेव्हा दोन्ही इसमांनी त्याचा पाठलाग सुरु केला. दासला फोन आल्यामुळे तो बोलत असतानाच दोघांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. दास त्याच्या पाठीमागे पळणार एवढ्यात दुसऱ्या इसमाने त्याला धक्का देऊन त्याच्याजवळील रोकड घेऊन तेथून पळ काढला’ असे पोलीस सूत्रांनी याबाबत बोलताना सांगितले.

घटनेनंतर भेदरलेल्या आणि घाबरलेल्या दासने साकीनाका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

‘दासने सांगितलेल्या वर्णनानुसार दोन्ही तरुण हे २०-२५ वयोगटातील आहेत. आम्ही एटीएम आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजसह तांत्रिक पुरावे जमा करत आहोत’ असेही याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes