विद्यार्थांच्या फी भरणासाठी रिपाइंकडून पवई इंग्लिश शाळेला ५ लाखांची मदत

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि आर्थिक घडी बिघडलेल्या अनेक पालकांच्या पुढे आपल्या पाल्यांच्या शाळेच्या फीचा प्रश्न सतावत असतानाच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड क्रमांक १२२ने मदतीचा हात दिला आहे. रिपाइं वार्ड क्रमांक १२२ तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शाळेची फी सहजरित्या भरता यावी यासाठी पवई इंग्लिश शाळेला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. रिपाइं पदाधिकारी यांनी रक्कमेचा धनादेश शाळा प्रशासनाला शनिवारी सुपूर्द केला.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांची आर्थिक घडी बिघडली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशात घरखर्च चालवण्यासोबतच मुलांच्या फीचा प्रश्न या कुटुंबाना सतावत आहे. आर्थिक स्थिती खराब झाल्याने अनेकांना आपल्या पाल्यांची फी भरणे कठीण झाले आहे. पवईतही अनेक शाळेत विद्यार्थ्यांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे.

पालकांची परिस्थिती लक्षात घेत यासाठी प्रयत्नशील भाऊ पंडागळे यांच्या प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळ गरूड, शाखा अध्यक्ष विनोद लिपचा, विक्रोळी तालुका युवक अध्यक्ष राजू राऊत, किशोर गायकवाड, राहुल इंगळे, सिद्धार्थ गायकवाड इत्यादी कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि मेहनतीच्या जोरावर ५ लाखांचा धनादेश पवई इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका शर्लिन पिल्ले यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

या मदतीने अनेक विद्यार्थ्यांच्या शालेय फीचा प्रश्न मार्गी लागला असून, येणाऱ्या काळात अजूनही काही विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मनसुबा असल्याचे कार्यकर्त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!