पालिका ‘एस’ विभाग कोविड -१९च्या यादीत पहिल्या दहात

पालिका ‘एस’ विभाग कोविड -१९

भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवईचा काही भाग यांचा समावेश असलेला पालिका ‘एस’ विभाग अल्प कालावधीतच कोविड -१९ यादीत खालच्या स्थानावरून अव्वल दहामध्ये पोहचला आहे. पूर्व उपनगरातील या विभागात एकट्या गेल्या आठवड्यातच ६०० हून अधिक रुग्ण आढळले असून, मुंबईत हे आठव्या क्रमांकावर आहे. बहुतेक बाधित हे भांडूप, विक्रोळी येथील झोपडपट्टी सदृश्य भागातील असून, अपमार्केट असणाऱ्या पवईचा सुद्धा त्यात समवेश आहे.

हिरानंदानी येथून रुग्ण मिळण्याची सुरुवात झालेल्या हा विभाग एप्रिल महिन्यात शेवटच्या दहामध्ये होता. त्यानंतर मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळू लागल्याने मोठी उसळी घेतली आहे. यात जूनमध्ये वेगाने वाढ झाली आहे. १ जून रोजी प्रभागात १,७०५ बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर १६ जून रोजी ही संख्या ३,१६६ इतकी नोंदवली गेली आहे, जी दुपटीच्या जवळपास आहे.

सक्रिय प्रकरणांची टक्केवारी ५९%

या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा दर १८ दिवसांचा आहे. एकूण बाधितांपैकी १८७३ सक्रीय तर उर्वरित बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय प्रकरणांची टक्केवारी ५९% आहे. एस विभागाचा सरासरी बाधित वाढीचा दर अनेक वॉर्डांपेक्षा ३.८% इतका आहे. जो इतर विभागाच्या प्रमाणात जास्त आहे. आर नॉर्थ वॉर्डमध्ये वाढीचा सर्वाधिक दर ५.५% इतका आहे.

विभागातील सर्वाधिक प्रकरणे भांडुप आणि कांजूरमार्गच्या पूर्व विभागातील आहेत. ज्यात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. तानाजीवाडी, सोनापूर, टेंभीपाडा, भांडुपमधील गावंदेवी, फुलेनगर, विक्रोळीतील आंबेडकर चौक आणि कन्नमवार नगरच्या काही भागांतून मोठ्या प्रमाणात बाधित मिळाले आहेत. हिरानंदानी गार्डन, पवईमधील उच्चभ्रू वस्तीमधील निवासी भागातही काही प्रकरणे आढळली आहेत. विभागात ७२ कंटेनमेंट झोन आणि १६७ सीलबंद इमारती आहेत.

“लॉकडाऊन रिलॅक्स झाल्याने आता कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. लोक सहकार्य करीत नाहीत. बहुतेक प्रकरणे झोपडपट्ट्यांमधीलच आहेत,” पोलीसांनी सांगितले.

चाळ सदृश्य लोकवस्तीमध्ये घरात शौचालय नसल्यामुळे सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज गर्दी होत आहे. लोकांना आता अलगीकरणात जाण्याची इच्छा नाही. पालिका ‘एस’ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधत काही कंटेमेंट झोनमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. यामुळे प्रसार रोखण्यास मदत होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात महानगरपालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!